
>>व्यंकटेश सोळंके
कादंबरी प्रतिभेचा कलात्मक शृंगार असते. त्यालाच साक्षात्कारी स्वरूपाचं कलात्मक रुपक असे म्हणतात.
प्रत्येकाच्या वाटय़ाला येणारा कॅनव्हास व त्यातील रंग जसेच्या तसे भरण्याचा लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मग तेच रंग वाचकासोबत गुज करत असतात. तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना तरुणपिढीचे लक्ष वेगवेगळ्या गोष्टीकडे आकर्षित होते. त्यातून आपले रोल मॉडेल बनवते. चित्रपट, कथा व कादंबरी यातील पात्रं त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. तशीच काहीशी या कादंबरीतील नायिकेच्या प्रवासाची सुरुवात आहे. प्राजक्ता कादंबरीतील मुख्य पात्र आहे. तिच्यावर प्रेमकथांचा पगडा आहे. तारुण्यसुलभ रम्य स्वप्न पाहणारी प्राजक्ता माधवराव व सुबोधच्या वैचारिक प्रगल्भतेतून घडत जाते. अगोदर अल्लडपणात घेतलेले निर्णय योग्य कसे हे ती सिद्ध करून दाखवते.
सुबोध या कादंबरीचा नायक आहे. लहान वयातच टक्केटोणपे खाऊन त्याला आलेली समज ही कर्तव्यतत्पर आहे. सामाजिक भान व समाजाचं ऋण ही भावना त्याच्यात ओतप्रोत भरलेली आहे. ज्या संस्थेने आधार दिला. त्या आधार संस्थेसाठी समर्पण व कार्य करण्याची त्याची मनोमन भावना असते. त्या भावनेपुढे त्याच्याकडे प्रेमाला थारा नसतो. त्याच्या आईनं घाणीत राहून आपलं अस्तित्व जपलं याचं त्याला भान आहे. त्याचा आई व आधार संस्थेसाठी असलेला कृतज्ञ भाव त्याला प्राजक्तापासून लांब राहण्यास प्रवृत्त करत असतो.
सुबोधला वाढवण्यासाठी त्याची आई, सुमतीने अनेक यातना सहन केलेल्या असतात. सुबोध लहान असतानाच वडिलांचे निधन होते. मग हलाखीच्या परिस्थितीतील निराधार व सुंदर सुमतीला आपलेच म्हणवणारे पोटाच्या खळगीचं आमिष दाखवून वाममार्गाला लावतात. अनिच्छेने गरजेपोटी कराव्या लागणाऱया कृतीही परिस्थितीजन्य आदर्श कशा ठरतात हे कादंबरी अधोरेखित करते. सुबोध आणि प्राजक्ताचं प्रगल्भ होत जाणं, नात्यातील वीण घट्ट होत जाणं आणि यासोबतच आजूबाजूच्या नात्यांची उकल होणं हाच प्रवास कादंबरीत आपण अनुभवतो. गरिबी माणसाला जीवनात मजबूर बनवते. गरिबीचे रंग, रूप वेगळे असतात. सुबोधच्या एकंदरीत जीवनशैलीतून कादंबरी जीवन तत्त्वज्ञान मांडते. अल्लड नायिकेत हळूहळू विचार व अनुभवांच्या बिया रुजत जातात. ती एक मोठं धैर्याचं पाऊल टाकते. तेच विधायक परिवर्तन या कादंबरीचा मथितार्थ ठरते. चौकटबद्ध जगणारी मध्यमवर्गीय माणसं परिस्थितीला शरण न जाता काहीतरी करण्याचं सामर्थ्य अंगी बाळगतात तेव्हा माणसांकडून न सुटणाऱया प्रश्नांना काळ सोडवतो. ही या कथेची सिद्धता आहे. लोक पायी चालू देत नाही व घोडय़ावर ही बसू देत नहीत. अस्तित्व टिकवण्यासाठी जे काम मिळतं ते करायला काही हरकत नसते. तेव्हाच कुठे कार्याला सकारात्मक शक्ती येऊन मिळतात. सुबोध व प्राजक्ता या अशा शक्तीचे स्त्रोत ठरतात.
एकंदरीत उन्हाची सावली हा कादंबरीपट स्वप्न, कर्तव्य , कदर, आदर व प्रेम या भावनांना अधोरेखित करतो. मातृत्व, पितृत्व व कर्तृत्व या आदर्शाना जपतो.
बदलत्या जगाच्या बदलत्या संकल्पनांचा समतोल लेखाजोखा या कादंबरीत येतो. मर्यादा व संस्कृती याही पलीकडे जाऊन मानवता धर्माची शिकवण या कादंबरीत मिळते.
समाजाला सुधारणेची दृष्टी देणारी व जीवनमूल्य समजावणारी कादंबरी अशी रेखा बैजल यांची समर्पक पाठराखण कांदबरीचे गुणवैशिष्टय़े मांडते. तसेच प्राजक्ताचा कोमल प्राजक्ती स्वभाव दाखवणारं प्राजक्ता कुलकर्णी व प्रत्युष यांचं मुखपृष्ठ कादंबरीच्या मथितार्थाने समर्पक वाटते.
उन्हाची सावली
लेखिका ः आराधना कुलकर्णी
मुखपृष्ठ ः प्राजक्ता कुलकर्णी व प्रत्युष प्रधान
पृष्ठ: 104, मूल्य: रुपये 150/-





























































