लेख – ऐका आपल्या आरोग्याची हाक

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत माणसाचे आयुष्य धकाधकीचे झाले आहे. एवढे की आरोग्याकडेही लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही. 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जीवनशैली जसजशी बदलत चालली तसतसे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. ज्या आरोग्याने आपल्याला जीवन समृद्ध करण्याची ताकद दिली त्या आरोग्याची हाक ऐकायला नको का? निरोगी शरीर हे उत्तम जीवनशैलीचे लक्षण समजले जाते.

शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे हे सर्वात महत्त्वाचे वरदान समजले जाते. खरे तर प्रत्येक जण निरोगी आयुष्याचे स्वप्न बाळगतो, पण चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यातल्या बहुतेकांची आयुष्यातली बरीच वर्षे विविध आजारांना सामोरे जाण्यातच व्यतीत होतात. त्यातही महागाईमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. अर्थातच आजारी पडणे हे सर्वसामन्यांसाठी न परवडणारे आहे. म्हणजेच आजारी पडू नये यासाठी काळजी घेणे क्रमःप्राप्त झाले आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे,

‘Prevention is better than cure’ आजारी पडल्यावर औषधोपचारावर खर्च करण्यापेक्षा आजारीच पडू नये याची काळजी घेणे आवश्यक ठरत आहे.

अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे धावपळीच्या जगात, स्पर्धेच्या जगात स्वतःच्या शारीरिक मनस्वास्थ्याकडे कुणालाही बघायला सवड नाही. जो तो धावत आहे. हे कुठे तरी थांबावे व आपल्या शरीराची हाक ऐकावी यासाठी योगसाधना, प्राणायामाचे धडे लोक जागोजागी गिरवताना दिसतात. लोक आपल्या सुदृढ प्रकृतीसाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार घेताना दिसतात. म्हणजेच एकूणच स्वतःच्या प्रकृतीबद्दल बरीचशी जागरूकता आलेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा धावपळीच्या जगात जरा थांबून आपल्या शरीराची हाक, आपल्या आरोग्याची आर्त हाक ऐकण्याचा तर हा दिवस नव्हे ना?

खरे तर आपल्याकडे आरोग्य तज्ञांना वा डॉक्टरांना देवानंतरचे स्थान देण्यात आले आहे, पण आरोग्य क्षेत्रातल्या या बदलत्या वास्तवामुळे प्रगत वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आदरपासून आता तिरस्कारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. उपचारविषयक आर्थिक बाबींवर होणारा बेबनाव हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते. तसे पाहिले तर 21 व्या शतकात इतर क्षेत्राप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रांनीही प्रगतीचे महत्त्वाचे पल्ले गाठले आहेत. बायपास सर्जरी, किडणी रोपण, गुणसूत्र शस्त्र्ाक्रिया अशा कधी काळी अशक्यप्राय वाटणाऱया गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. तांत्रिक प्रगतीच्या बळावर खूपसे आजार आटोक्यात आले आहेत. आजारग्रस्त रुग्णांना बऱयाच प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे, पण एकीकडे शरीर दुरुस्त होत असताना आणखी एक गोष्ट रुग्णांना जाणवू लागली आहे, ती म्हणजे उपचारांच्या खर्चापायी कोलमडत जाणारी आर्थिक परिस्थिती.

आज आसपास पाहिले की असे दिसते की, सामान्य माणूस भविष्यातल्या एक ना अनेक गोष्टीसाठी तरतूद करून ठेवतो. अपवाद असतो फक्त एका गोष्टीचा. आरोग्यविषयक उपचारासाठी अत्यावश्यक अशा आर्थिक तरतुदींचा. आजारी पडल्यानंतर खर्चासाठी लागणारे पैसे कुठून गोळा करायचे हा यक्ष प्रश्न वेळ पडेल तेव्हा पाहू म्हणून दुर्लक्षिला जातो. त्यामुळेच मग आजारपणाच्या खर्चाचे आकडे जेव्हा जेव्हा पुढे येतात तेव्हा धक्का बसण्याची वा कोलमडून जाण्याची वेळ अनेकांवर येते. हिंदुस्थानामध्ये काही वर्षांपूर्वी मेडिक्लेम ही योजना वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेसाठी कार्यान्वित केली गेली, पण या योजनेला त्या वेळी काही कारणांमुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्या योजना पुढीलप्रमाणे. (1) विमा कंपन्यांचे औदासिन्य, (2) प्रचार व प्रसाराचा अभाव, (3) लवचिकतेचा अभाव, (4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये रुग्णाला आधी इस्पितळाच्या बिलाची पूर्तता करावी लागे त्यानंतर बिलाची रक्कम विमा कंपनीकडून परत मिळविण्यासाठी खटाटोप करत बसावा लागे. यात खूप साऱया तांत्रिक अडचणी निर्माण होऊन रुग्णाला मनस्ताप होत असे.

वरील अनुभवावरून बोध घेऊन काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने विनाशुल्क वैद्यकीय विमा अथवा कॅशलेस मेडिक्लेम ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेद्वारे रुग्णाला वैद्यकीय विमा संरक्षण असल्यास इस्पितळात दाखल होताना फक्त अनुमती करून उपचार करून घेता येतात. बिलाची पूर्तता परस्पर होत असल्याने फक्त बिलावर सही करून रुग्णाला घरी जाता येते. याचा फायदा म्हणजे कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण अचानकपणे रुग्णावर येत नाही. तसेच इस्पितळास बिलाच्या पूर्ततेची हमी असल्यामुळे उपचार त्वरित व योग्यरीत्या होतात. आर्थिक बाबींचा ताण दोन्ही पक्षांवर येत नाही. उपचार करणाऱयांवर वा उपचार करून घेणाऱयांवर त्यामुळे इस्पितळात खेळीमेळीचे वातावरण राहण्यास मदत होते.

विविध विमा कंपन्यांच्या विविध करावरच्या आरोग्य विमा योजना आज कार्यान्वित आहेत. त्यांची माहिती संबंधित विमा कंपन्यांकडून मिळवून आरोग्य विमा उतरवणे हा आजचा सगळ्यात सुज्ञ निर्णय ठरू शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर रोज 1 रुपया भरल्यास म्हणजे 365 रुपयांत एका व्यक्तीस एका वर्षासाठी 30 हजार रुपयांचा आरोग्य विमा मिळू शकतो. याचा अर्थ त्या व्यक्तीस 30 हजार रुपयांपर्यंतच्या उपचाराविषयी खर्चाची काळजी करत राहण्याचे कारणच उरत नाही.

गेल्या वर्षीपासून कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यात बरेच जण मृत्युमुखी पडलेत. आता मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वच काही कोरोनाने गेले नाहीत. त्यामध्ये वयस्कर जास्त होते तसेच अनेक आजारांनी कवटाळलेही होते. दैनंदिन व्यायामाचा अभाव असलेलेही होते. व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरभर ऊर्जा स्रोत वहात असल्याने इतर रोगजंतूंना मज्जाव होतो. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. तेव्हा कोविड-19 लस टोचून घेणे, गरम पाणी पिणे, मास्क घालणे, व्हापारा घेणे, शक्यतो घराबाहेर न पडणे आदी उपचार पद्धती केल्यास या महामारीतून आपण सहज बाहेर पडू शकू.

आपली प्रतिक्रिया द्या