>> संजय मिस्त्री
छत्रपती संभाजीनगरातील विज्ञान वर्धिनी शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या एका मास्तराचे 1980 ते 90 या दशकात तत्कालीन स्थानिक आणि बाहेरगावहून येणाऱ्या दैनिकांमधून स्तंभलेखन प्रसिद्ध होऊ लागले आणि लोकप्रियही होऊ लागले होते. हे मास्तर म्हणजे अशोक उजळंबकर! उजळंबकर चित्रपटांशी निगडित एखादा विषय हाती घ्यायचे आणि चित्रपटातील विषयाचे तंत्र कितीही अवघड असो उजळंबकर सोप्या, ओघवत्या, रसाळ शब्दरचनेने वाचकांना घायाळ करायचे की, त्यांचे लेख वाचले की लोकांना त्या-त्या गायकांविषयी, गाण्यांविषयी, नाटय़ किंवा सिनेमाविषयी ओढ लागायची. छत्रपती संभाजीनगर शहरात सिने पत्रकारिता चालवण्याचे, रुजवण्याचे आणि वाढवण्याचे काम उजळंबकर यांनी केले.
महाराष्ट्रातील विविध दैनिकांमध्ये चित्रपट, दूरदर्शन या विषयाकर त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभलेखन केलेले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजकर त्यांनी तब्बल 3,365 मुलाखती घेतल्या आहेत. तसेच चित्रपट विषयास वाहिलेल्या ‘नवरंग रुपेरी’ नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी 1987 साली केली व 35 वर्षे त्याचे संपादन केले. ‘नवरंग रुपेरी’ अंकास आतापर्यंत उत्कृष्ट दिकाळी अंकाचे तब्बल 35 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटांचा, त्यातील गाण्यांचा, शूटिंगबाबतचा खडान्खडा इतिहास त्यांना माहिती असल्याने फिल्मी किश्श्यांची तर ते बरसातच करतात. त्यांच्या या माहितीच्या खजान्याचे कालांतराने त्यांनी वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाच्या सादरीकरणात रूपांतर केले. त्यांच्या चित्रपट संगीतावर आधारित विविध दृकश्राव्य कार्यक्रमांचे ते संचालन करू लागले.
प्रामुख्याने बिनाका गीतमाला, चार चौघी, महाराष्ट्र भूषण सुलोचना, अशी मी जयश्री, मधुबाला ते माधुरी दीक्षित, एक शाम साहिर के नाम. फडके-माडगुळकर-देशपांडे जन्मशताब्दी वर्षात त्यांनी 40 यशस्वी प्रयोग केले. चित्रपटविषयक त्यांच्या ज्ञानाचे प्रत्यंतर त्यांच्या पुस्तकांवरूनही येते. त्यांनी हिंदी चित्रपटांचा इतिहास सांगणारे पुस्तक ‘तुम्हे याद होगा!’, 40 हिंदी चित्रपट दिग्दर्शकांचा प्रवास सांगणारे पुस्तक ‘लाईट्स कॅमेरा ऍक्शन’, हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास सांगणारे पुस्तक ‘रसिक बलमा’, हिंदी चित्रपटातील गायकांची माहिती सांगणारे ‘वो जब याद आये’, हिंदी चित्रपटातील नायिका ‘मोहे भूल गये सांवरिया’ ही पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. चित्रपट माध्यमाकर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत मार्गदर्शक आहेत.