अरुणाचलच्या 5 बेपत्ता युवकांना चीनने हिंदुस्थानकडे सोपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशच्या चीनला लागून असलेल्या सीमेवरून बेपत्ता झालेल्या 5 हिंदुस्थानी युवकांना चिनी लष्कराने हिंदुस्थानच्या ताब्यात दिले आहे.लष्करातील सूत्रांनी शनिवारी सकाळी ही माहिती दिली. या युवकांना हिंदुस्थानकडे सोपवण्याची प्रक्रिया चीनच्या भागात पार पडली. किबीथू सीमा चौकीवरुन या युवकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने या युवकांना हिंदुस्थानी लष्कराकडे सोपवले. या युवकांना आता कोरोना प्रोटोकॉलनुसार 14 दिवस विलगीकरणात ठेऊन नंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवण्यात येणार आहे.

अरुणाचल सीमेकरून बेपत्ता झालेले युवक चीनच्या ताब्यात असून त्यांना चीन हिंदुस्थानकडे सोपवणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटद्वारे दिली होती. एक सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले हे पाच युवक शिकारी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. अरुणाचलच्या 5 युवकांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याची तक्रार अरुणाचलचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिन्ग यांनी केली होती. त्यानंतर 6 सप्टेंबरला हिंदुस्थानी लष्करी अधिकाऱयांनी चिनी लष्करी मुख्यालयात संपर्क साधत बेपत्ता हिंदुस्थानी युवकांबद्दल विचारणा केली होती.त्यानंतर चीनच्या लष्कराने बेपत्ता हिंदुस्थानी चीनच्या ताब्यात असल्याचे सांगत त्यांना लवकरच मायदेशी पाठवले जाईल असे सांगितले होते.

पहाडावर जडीबुटी शोधताना भरकटले अरुणाचलचे युवक
बेपत्ता झालेले अरुणाचलचे 5 युवक सीमेवर मॅकमोहन लाईनवर पहारा देणाऱ्या लष्करी जवानांचे सामान वाहून नेण्याचे काम करायचे. 5 सप्टेंबरला ते पहाडी भागात औषधी जडीबुटी शोधताना चुकून चीनच्या हद्दीत गेले आणि चिनी लष्कराच्या ताब्यात सापडले होते. हे सर्व युवक अरुणाचलच्या तागीन या आदिवासी समाजाचे असून ते 18 ते 20 वर्षे वयोगटातील आहेत. या बेपत्ता युवकांची नावे टोक सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगतु इबिया, तानू बेकर आणि नागरू दिरी अशी आहेत. चिनी जवानांनी 1 सप्टेंबरला या युवकांचे अपहरण केले असा आरोप अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिन्ग यांनी केला होता. या युवकांना सोडवण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मदत करावी असे साकडेही आमदार एरिन्ग यांनी घातले होते.