
दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेवेळी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा थेट उल्लेख करत त्यांनी भाजपवाले आपच्या आमदारांच्या संपर्कात असून त्यांच्यावर भाजपमध्ये येण्यास दबाव टाकत असल्याचंही केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवाल म्हणाले की, भाजपला मला अटक करायची आहे. केजरीवालला अटक कराल, पण त्याच्या विचारांना कशी अटक कराल? सगळा देश पाहतो आहे, लोक आता प्रश्न विचारायला लागले आहेत की, पंतप्रधान हे केजरीवाल यांना संपवणार का, चिरडणार का? आज भाजपसाठी सगळ्यात मोठं राजकीय आव्हान आम आदमी पार्टी आहे. जर 2024मध्ये भाजप हरली नाही तर 2029मध्ये आम आदमी पार्टी देशाला भाजपमुक्त करेल, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपच्या भविष्याला आपपासून धोका आहे. त्यामुळे त्यांनी आमची धास्ती घेतली आहे. दिल्लीत 70 पैकी 67 जागांवर आप निवडून आला तर भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या. या लोकांनी केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आम्हाला खूप त्रास दिला. पण, 2020च्या दिल्ली निवडणुकांमध्ये 70 पैकी 62 जागा आम्ही मिळवल्या. भाजपला दिल्लीतला पराभव अजूनही पचत नाही. त्यांनी हिंमत असेल तर किमान एका राज्यात वीज मोफत करून दाखवावी. पंजाब आणि दिल्लीत वीज खंडित होण्याचं प्रमाण शून्यावर आलं आहे, त्यांनी सध्यातरी फक्त गुजरातच्या 10 शाळा नीट करण्याकडे लक्ष द्यावं, असं केजरीवाल म्हणाले.
देशभरात भाजपने जितके आमदार खरेदी केले, त्यासाठी पैसे कुठून आले, असा रोखठोक सवाल केजरीवाल यांनी यावेळी विचारला. 2024मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप दिल्लीत विधानसभा संपवेल. दिल्ली ही कुणाच्या बापाची जहागीर आहे का, की विधानसभा बरखास्त करतील? असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

























































