जेलमधून आर्यनने केला शाहरूख खानला व्हिडीओ कॉल

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला 20 तारखेपर्यंत तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. त्याच्या जामीन अर्जावरील आदेश 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

आर्यन खान याचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे, तिथून त्याने आपले वडील शाहरूख आणि आई गौरी यांना व्हिडीओ कॉल लावल्याचं सांगण्यात आलं आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

क्रूझ पार्टीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन, अरबाज आणि मुनमुनच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे आज उच्च न्यायालयात गेल्याने त्यांना सत्र न्यायालयात सुनावणीसाठी येण्यास उशीर झाला. सुनावणी सुरू झाल्यावर एका 72 वर्षीय समाजसेवकाने आर्यनला जामीन मिळू नये म्हणून इंटरविनर म्हणून अर्ज केला, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. आर्यन, अरबाज आणि मुनमुनच्या जामीन अर्जाला विरोध करत अनिल सिंग यांनी युक्तिवाद सुरू केला. आर्यनने पहिल्यांदाच ड्रग्ज घेतले असे नसून तो गेल्या काही वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत असल्याचे एनसीबीने न्यायालयात सांगितले. तर या कटात परदेशी नागरिकदेखील सहभागी असल्याने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले असून परदेशी पेडलरचा या केसमध्ये सहभाग असल्याने त्याचा तपास व्हावा. आमचे अधिकारी जेव्हा रेड करायला जातात तेव्हा त्यांच्यावर हल्ले होतात, अनेकदा अधिकाऱयांना रुग्णालयात दाखल करावे लागते. जिवावर उदार होऊन अधिकारी काम करत आहेत, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले.

अरबाज आणि आर्यनकडे कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. तर त्याचा मोबाईल जप्त केला त्याची नोंदच नाही. पंचनाम्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. आर्यन आणि अरबाजचा परदेशी पेडलरशी काही संबंध नाही. त्यामुळे त्या दोघांना जामीन मिळावा असा युक्तिवाद केला. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अरमान कोहली या केसचे दाखले देण्यात आले. अर्चितकुमार आणि शिवराज हे अरबाजला ड्रग्ज पुरवत असायचे असे एनसीबीने न्यायालयात सांगितले. त्यानंतर आर्यनचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. एनसीबी हे वारंवार ड्रग्ज आणि रोख रकमेबाबत बोलत आहे, पण आर्यनकडे काही ड्रग्ज सापडले नाही. एनसीबीने अरबाजकडून 6 ग्रॅम चरस जप्त केल्याचे देसाई यांनी न्यायालयात सांगितले. आज तीन तास सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. तर आर्यन, अरबाजसह पाच जणांना आर्थर रोड जेलमधील क्वारंटाइन सेलमधून काढून कॉमन बॅरेकमध्ये पाठवण्यात आले आहे.