वडाळा टी.टी. पोलिसांना तीन वर्षांचा मुलगा सापडत नसल्याने वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुलाला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
ऍड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती ऍड. कोदे यांनी न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी केली. या याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी होईल.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध
2016मध्ये नवरात्री उत्सवात पत्नीसोबत भेट झाली. 2017मध्ये आमचा विवाह झाला. आम्ही शीव येथे वास्तव्यास होतो. 2021मध्ये मुलगा झाला. त्यानंतर आम्ही पिकनिकला गेलो होतो. तेथे पत्नीची एकासोबत ओळख झाली. दोघे एकमेकांसोबत वारंवार बोलायचे. त्यावर मी आक्षेप घेतला. सासू-सासऱयांना ही गोष्ट सांगितली. त्याने काहीच फरक पडला नाही. धक्कादायक म्हणजे पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. नंतर पत्नी परत आली. ती तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. तेथूनही ती निघून गेली, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
सासू–सासरे प्रतिवादी
पत्नी, तिचा प्रियकर व सासू-सासरे यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. वडाळा टी.टी. पोलीस या याचिकेत प्रमुख प्रतिवादी आहेत.
पत्नी, तिच्या प्रियकराने मुलाला पळवले
10 जून 2024 रोजी मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याचा आवाज बंद झाला. बाहेर येऊन बघितले तर पत्नी व तिचा प्रियकर मुलाला घेऊन पळत होते. त्यांचा पाठलाग केला. ते हाती लागले नाहीत. वडाळा टी.टी. पोलिसात तक्रार केली. मुलगा सापडला नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.