प्राचार्यांना मारहाण करणे महाग पडले, मारकुटे आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांच्या कक्षात घुसून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणारे मारकुटे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ‘अपडाऊन’ फेम काही शिक्षकांचाही समावेश आहे.

हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय हे मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता. कर्मचार्‍यांनी केलेल्या आरोपाची शहानिशा न करतानाच शिंदे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी 18 जानेवारी रोजी थेट प्राचार्य उपाध्याय यांच्या कक्षात घुसून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाहीतर त्यांचा कानही पिरगाळला.

आमदार बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य उपाध्याय यांचे बखोट धरून त्यांना मारहाणही केली. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले. प्राचार्य उपाध्याय यांनी आपण बेशिस्त कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अपडाऊन करणार्‍या शिक्षकांनाही समज दिली. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगितले.

आज सकाळी प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. आमदार संतोष बांगर, शंकर बांगर, महाविद्यालयातील अधिव्याख्याता कपूर, देशपांडे, शेख, वसुंधरा पाटील, मंगनाळे, फकीर यांच्यासह 40 जणांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.