मीराबाई चानूला ऑलिम्पिकचे तिकीट, आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत कास्यपदक

हिंदुस्थानची माजी जगज्जेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत क्लीन ऍण्ड जर्क प्रकारात 119 किलो वजन उचलून नवा विश्वविक्रम केला. या स्पर्धेत तिने कास्यपदकाची कमाई केली. याचबरोबर अनिवार्य असलेल्या सर्व सहा पात्रता स्पर्धेत सहभागी होऊन मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकचेही तिकीट बुक केले.

26 वर्षीय मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 86 किलो वजन उचलले, मात्र क्लीन ऍण्ड जर्कमध्ये तिने 119 किलो वजन वजन उचलून नवा विश्वविक्रम केला. एवैण 205 किलो वजन उचलून मीराबाई या स्पर्धेत कास्यपदकाची मानकरी ठरली. याआधी क्लीन ऍण्ड जर्कमध्ये 118 किलो वजनाचा विक्रम होता. तो विक्रम मोडण्यात मीराबाईला यश आले. स्नॅचमध्ये तिची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या दोन प्रयत्नांत तिने 85-85 किलो वजन उचलले, मात्र तिसऱया प्रयत्नांत तिने 86 किलो वजन उचलले. क्लीन ऍण्ड जर्कची सुरुवात मीराबाईने 113 किलो वजन उचलून केली. त्यानंतर 117 किलो वजन उचलून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. शेवटी 119 किलो वजन उचलून मीराबाईने नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हे वजन तिच्या वजनच्या दुपटीहून अधिक आहे, हे विशेष.

चीनला सुवर्ण अन् रौप्य

या गटात चीनच्या वेटलिफ्टर्सनी सुवर्ण व रौप्यपदके जिंकली. होऊ जिहीहुई हिने एकूण 213 किलो (96 किलो व 117 किलो) वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर जियांग हुईहुआ हिने एकूण 207 किलो (89 किलो व 118 किलो) वजन उचलून रौप्यपदक मिळविले. या दोघींनीही ऑलिम्पिकचे तिकीट मिळविलेले आहे.

45 किलो वजनी गटात झिलीचा धमाका

हिंदुस्थानच्या आणखी एका खेळाडूने आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले. झिली डेलाबेहेरा हिने 45 वजनी गटात गोल्ड मेडलला गवसणी घातली. तिने स्नॅचमध्ये 69 किलो वजन उचलले. हिंदुस्थानच्या खेळाडूने क्लीन ऍण्ड जर्कमध्ये 88 किलो वजन उचलले. एकूण 157 किलो वजन उचलून तिने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र ऑलिम्पिकमध्ये 45 किलो वजनी गटाचा समावेश नसतो.

आपली प्रतिक्रिया द्या