
काही महिन्यांपूर्वी वांद्रे स्थानकावरून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुटका करण्यात 81 दिवसांनंतर पोलिसांना यश मिळाले आहे. मंगळवारी आयत खानला (2) तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आसिफ अली याला अटक केली आहे. सुरूवातीला आसिफने आयतचे भिक मागण्यासाठी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना होता मात्र, पोलीस तपासात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. आसिफ आयातला त्याची लकी चार्म मानायचा व गेल्या तीन महिन्यापासून तो तिला स्वत च्या मुलीसारखे जपत होता. त्याउलट अपहरण होण्याआधी आयतचे आई वडीलच तिला आसिफसोबत भिक मागायला पाठवायचे व त्याच्याकडून पैसे उकळायचे. त्यावरूनच हे अपहरण नाट्य घडले होते.
गुडघ्याखाली दोन्ही पाय नसलेला आरोपी आसिफ अली शेख (24) याने ऑक्टोबर महिन्यात वांद्रे येथून अपहरण केले होते. पळवून नेत असतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर तब्बल 22 पोलिसांच्या तुकडीने 14 राज्यांमध्ये आयतचा शोध घेतला. अखेर पश्चिम बंगालमधील सिलगुडी भागात आसिफच्या घरी ती सापडली. सुरूवातीच्या तपासादरम्यान भिक मागण्यासाठी आयतचे अपहरण केल्याचा संशय होता. मात्र आसिफला अटक केल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली आहे. अपहरणानंतर आसिफने आयतला सिलगुडीमधील घरी ठेवले होते. त्याने त्याच्या आई आणि बहिणीला ती त्याची मुलगी असल्याचे सांगितले होते. तो आयतची स्वत:च्या मुलीसारखीच काळजी घेत होता. पोलिसांनी आसिफच्या आई आणि बहिणीला सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला.
आयतचे आई वडील आयतला आसिफसोबत भिक मागण्यासाठी पाठवत असत. आयतसोबत भिक मागितल्याने आसिफची दिवसाला 2000 रूपये कमाई होत होती, त्यापैकी 300 रूपये तो आयतच्या आई वडिलांना देत असे. आयतमुळे कमाई अधिक होत असल्याने मुलीच्या आई वडिलांनी जास्त हिस्सा देण्याची मागणी केली होती. आसिफने तिच्या आई वडिलांना जास्त पैसे मागितल्यास मी आयतचे अपहरण करेन अशी चेतावणी दिलेली. चेतावणी दिल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये फरक न पडल्याने आयतचे अपहरण केल्याचा जवाब आसिफने दिला. आयत आसिफला पूर्वी पासूनच ओळखत असल्याकारणाने तिला पळवून नेत असताना ती शांतपणे त्याच्यासोबत गेली. पोलिस स्थानकात देखील आसिफला पाहिल्यानंतर ती त्याच्याकडे धावत गेली.
























































