
भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये विधिमंडळ सचिवालयही सहभागी झाली आहे की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण नव्या विधानसभेच्या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून तब्बल 17 ज्येष्ठ सदस्यांची नावे सचिवालयाने राज्यपालांना सुचवली आहेत. त्यामुळे हे सचिवालय भाजपच्या तालावर नाचतेय अशीच चर्चा आहे.
विधानसभा सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करतात. हंगामी अध्यक्ष सर्वाधिक काळ सभागृहाचा सदस्य असावा, असे संकेत आजपर्यंत पाळण्यात आले आहेत. त्यासाठी विधिमंडळ सचिवालयाकडून दोन किंवा तीन सदस्यांची नावे राज्यपालांना पाठवली जातात. नंतर राज्यपाल त्यातील एक नाव निश्चित करतात. या वेळी ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांना हंगामी अध्यक्षपद मिळणे अपेक्षित आहे; परंतु सर्वच नियम व संकेत धाब्यावर बसवणारा भाजप हा नियम आणि संकेतही पाळणार नाही हे उघड झाले आहे.
विधिमंडळ सचिवालयाने यावेळी दोन-तीन नव्हे तर तब्बल 17 नावे राजभवनात पाठवली आहेत. या 17 जणांच्या यादीत बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, कालिदास कोळंबकर, के. सी. पाडवी, हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, गोवर्धन शर्मा, हितेंद्र ठाकूर, प्रकाश भारसाकळे, मंगलप्रभात लोढा आणि बबनराव शिंदे यांचा समावेश आहे.
दोन किंवा तीन ज्येष्ठ सदस्यांचीच नावे पाठवावीत असा प्रघात आणि संकेत असताना भाजपच्या सांगण्यावरून विधिमंडळ सचिवालयाने 17 नावे पाठवली आहेत. कारण उघड आहे. अशी नावे पाठवून संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे. सचिवालय भाजपच्या तालावर नाचतेय ते असे!



























































