मनपाच्या शाखा अभियंता आणि ट्रेसरला टीडीआर घोटाळ्यात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

महानगर पालिकेचे नगररचना विभागातील शाखा अभियंता शिवदास भग्गु राठोड आणि ट्रेसर मजहर अली महंमद अली यांना बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. टीडीआरसाठी अब्दुल सिकंदर यांनी सादर केलेला कोरा अर्ज मजहर अली यांनी आवक रजिस्ट्ररमध्ये नोंदवून घेतला आणि शिवदास राठोड यांनी कसलीही शाहनिशा न करता त्यावर टीडीआर देण्यासंदर्भात शेरा लिहिला असल्याचा आरोप या दोघांवर आहे.

दोघांना अटक केल्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती केलेली आहे. याशिवाय संबंधित टीडीआर देण्यासंदर्भात ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्या प्रत्येकाचा आता पोलीस शोध घेऊ लागली आहे. या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरी पोलीस पोहोचले असले तरी आगोदरच माहिती मिळाल्यामुळे उर्वरित अधिकारी मात्र फरार होऊ लागले आहेत. दरम्यान इकडे पोलिसांचे अटकसत्र सुरू होताच मनपाच्या नगररचना विभागातील टीडीआरच्या एकेक फाईली गायब होऊ लागल्या आहेत. पडेगाव गट नंबर ६ मधील एक टीडीआर मंजूर केल्याची फाईल आज गायब झाली असून ती ज्या अधिकाऱ्याच्या टेबलवरून गायब झाली आहे त्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे कळते.

अब्दुल सिकंदर यांची सराफा रोडवर एक मालमत्ता होती. त्याचा काही भाग रस्ता रूंदीकरणात जात होता. त्यांनी तो भाग मनपाला भूसंपादीत करुन दिला आणि त्याचा मोबदला म्हणून ८ लाख २५ हजार रूपये मनपाकडून घेतले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मनपात अब्दुल सिकंदर यांनी त्याच मोबदला मिळालेल्या जागेचा टीडीआर मिळावा म्हणून मनपात अर्ज केला. त्याच्या जबानीनुसार त्याचा हा अर्ज कोरा होता, अर्ज कोरा असल्याचे माहिती असूनसुध्दा मजहर अली यांनी हा अर्ज इनवर्ड करुन घेतला तर अर्ज कोरा असल्याचे माहिती असूनसुध्दा शिवदास राठोड यांनी सिकंदर यांना टीडीआर मिळावा अशा स्वरुपाचे नोटींग तयार करुन ही फाईल पुढे पाठवली. अशा प्रकारे त्यांनी घोटाळ्यास हातभार लावल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेत हा घोटाळा माजी महापौर विमल राजपूत यांचा मुलगा किशोर राजपूत यांनी उघडकीस आणला. घोटाळा समोर आल्यानंतरसुध्दा मनपा अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर या घोटाळ्यात संशयीत असल्याचे माहिती असूनसुध्दा मनपा आयुक्त निपून विनायक यांनी शिवदास राठोड यांची पुन्हा नगररचना विभागातच बदली करुन एकप्रकारे राठोड यास घोटाळ्यात सहभागी झाल्याबद्दल बक्षीसच दिले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे आता आयुक्तांची सुध्दा प्रतिमा मलीन झाली आहे.