
‘कोरोना’चा धसका तुरुंग प्रशासनानेही घेतला असून राज्यभरातील तुरुंगांमध्ये असलेल्या कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर व्हावा यासाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याचे कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले. तसेच पुढील 15 दिवस कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. फोन किंवा व्हिडीओ कॉल ते करू शकतात.
राज्यात 45 ठिकाणी 60 कारागृहे असून त्यात 38 हजार कैदी आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जणांना शिक्षा झाली आहे. मात्र ज्यांच्यावर खटला सुरू आहे किंवा ज्यांच्यावरील गुन्हा सिद्ध व्हायचा आहे अशा कच्च्या कैद्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टाला विनंती करणार आहोत. त्या कैद्यांची यादी न्यायालयाकडे पाठवण्यात येईल. तुरुंगातील कैद्यांमध्ये कोणाला कोरोनाची लागण झाली तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे रामानंद म्हणाले.






























































