‘बाबरी’ विध्वंस प्रकरणाचा निकाल 30 सप्टेंबरला, आडवाणी, जोशी, उमा भारती यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल 30 सप्टेंबर रोजी लखनौ येथील विशेष सीबीआय न्यायालय देणार आहे. निकालाच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींनी कोर्टात हजर राहावे असे आदेश न्यायाधीश एस.के. यादव यांनी दिले आहेत. दरम्यान, अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणाचे बांधकाम सुरू झाले असताना हा निकाल येणार आहे.

सहा डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी पाडली होती. याप्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयार, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साध्वी ऋतंबरा यांच्यासह 32 जणांवर आरोप आहेत. लखनौतील विशेष सीबीआय न्यायालयात खटला सुरु होता. न्यायालयाने 351 साक्षीदार तपासले.

कारस्थान करून आडवाणींना गोवण्यात आले – मिश्रा

या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी व्हिडीओ काँफेरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर झाले होते. त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. राजकीय कारस्थान  करून चुकीच्या पद्धतीने लालकृष्ण आडवाणी यांना गोवण्यात आले. त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे चुकीचे आहेत, असे आडवाणींचे वकील के.के. मिश्रा यांनी म्हटले आहे.