
बाबा मुलाखतीत एक छोटा पण शिकण्यासारखा किस्सा सांगायचे… बाबासाहेब लंडन मध्ये काही काळ राहिले होते, त्या काळात एके दिवशी त्यांना एक पत्र पाठवायचे होते. ते राहत होते तिकडे जवळच डाकघर असल्याने ते थेट डाकघरातच गेले, तिकडे अनेक पत्रे गोळा केली जात होती. बाबांना वाटले आपणही पटकन पत्र देऊन टाकू म्हणजे लवकर पोचते होईल. ते याच घाई मध्ये त्यांनी डाकघरातील कक्षात बसलेल्या मुलीकडून पोस्टाचे तिकीट विकत घेतले आणि घाईत ते तिकीट चिकटवून त्या मुलीकडे दिले.
बाबा निघतात तोच ती मुलगी त्यांना बोलावते आणि म्हणते या तिकिटावर आमच्या राणीचा फोटो आहे आणि तुम्ही हे तिकीट उलटे लावले आहे, आधी ते सरळ करा, बाबांनी ते तिकीट सरळ केले आणि त्या मुलीला प्रश्न केला की अहो मी पैसे तर तेवढेच दिले होते, मग फरक काय पडतोय तिकीट उलटे लागो किंवा कसेही आणि जर तुम्हाला न दाखवताच मी ते पत्र टपालपेटीत टाकले असते तर काय ते पोहोचले नसते का योग्य पत्त्यावर?
बाबांच्या प्रश्नाला उत्तर देताना ती मुलगी म्हणाली, माझ्या नकळत ते पत्र पेटीमध्ये गेले असता मी जबाबदार नसते परंतु माझ्या डोळ्यांदेखत माझ्याच देशाच्या राणीचे डोके उलटे करून तिकीट लागले आहे हा माझ्यासाठी माझ्या राणीचा आणि देशाचा अपमान समजते मी आणि म्हणून माझ्या डोळ्यादेखत हे होत असताना ते थांबवणे तर माझ्या हातात आहेच की.
हा किस्सा सांगून बाबा खंत व्यक्त करतात, बाबा म्हणतात त्यांच्याकडे त्यांच्या इतिहासाबद्दल, राजाराणींबद्दल, देशाबद्दल किती अभिमान आहे, जागरूकता आहे मग आपल्याकडेच इतिहास आणि ऐतिहासिक मंडळी गांभीर्याने का घेतली जात नाहीत ? आपण इतिहासाची टिंगल–टवाळी आणि निंदानालस्ती का करतो? समाजात शिवरायांबद्दल अनेक खोटय़ा दंतकथा रुजल्या आहेत आणि अशा वेळी सत्य नाही पण दंतकथा लोकांकडे जास्त जलद जातात म्हणूनच देशाला इतिहास संशोधन करणाऱया मंडळींची जास्त गरज आहे. आपण आपल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू याच निष्काळजीपणामुळे गमाविल्या आहेत याची बाबांना खंत वाटायची.

































































