एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणार – महापौर घोडेले

1329

महानगरपालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक प्रियदर्शनी उद्यानात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानातील एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. या संदर्भात झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले ते निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महापौर म्हणाले.

संभाजीनगर शहरावर शिवसेनाप्रमुखांचे अतोनात प्रेम होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक शहरात उभारण्यात यावे अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक प्रियदर्शनी उद्यानात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक उभारण्यासाठी मनपाने 65 कोटी रूपयाच्या आराखडा तयार करुन त्या कामाच्या अंदाजपत्रकास मंजूरी दिली आहे. या स्मारकाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु तत्कालीन सरकारने स्मारक उभारण्यासाठी दहा कोटीच्या निधीची तरतूद केल्याचे पत्राद्वारे कळविले होते. त्यामुळे निविदा उघडण्यात आल्या नाहीत.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त निराधार असून एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील आरे शेडच्या कामासाठी झाडे तोडण्यास स्थगिती दिली. त्यांच्या भूमिकेशी सुसंगत राहूनच एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारले जाईल. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संदर्भात जो निर्णय देतील तो निर्णय शिरसावंद्य राहिल, असेही महापौर घोडेले म्हणाले. तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नाही असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या