मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत होणार ग्रामपंचायतींचा कायापालट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून शिवसेनाप्रमुख  मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीचा कायापालट होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही अशा ३०२ ग्रामपंचायतींना या योजनेचा फायदा होणार आहे. पंकजा मुंडे मंत्री असलेल्या ग्रामविकास खात्याच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

ग्रामीण भागाच्या विकासाची मध्यवर्ती संस्था म्हूणून परिचित असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयांना आता नवीन इमारत मिळणार आहे. १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात व कार्यालयासाठी स्वतःची स्वतंत्र इमारत नसलेल्या राज्यात जवळपास ३०२ ग्रामपंचायती आहेत. ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी’ योजना लाभ या ग्रामपंचायतींना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सुसज्ज आणि अद्यावत अशी दोन मजली इमारत बांधली जाणार असून या इमारतीसाठी प्रत्येकी १२  लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामविकास खात्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाची जाण ठेवत योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेअंतर्गत पुणे-२५, सातारा-३, सांगली-४, कोल्हापूर-१७, सोलापूर-२, संभाजीनगर – ११, नांदेड-१८, हिंगोली-७, धाराशिव-४, जालना-९ , परभणी -९, बुलढाणा-१६, यवतमाळ-१२, चंद्रपूर-६, गडचिरोली-३, नागपूर -६, अकोला-७, वाशीम-३, अमरावती-२, गोंदिया -१, लातूर-५,  बीड-६४, नाशिक-१३, धुळे-३, जळगाव-१६, नगर-२०, सिंधुदुर्ग-१, रायगड-१२, रत्नागिरी-२, पालघर -१ ग्रामपंचायत कार्यालये बांधली जाणार आहेत.