काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यानंतर या अधिवेशनात विरोधी पक्षनेता कोण, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच काँग्रेसकडून आज विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे.

सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे विद्यमान सरकारचे अखेरचे अधिवेशन आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून आज विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी, शरद रणपिसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी, नसीम खान-उपनेता विधानसभा आणि बसवराज पाटील-मुख्य प्रतोद, रामहरी रूपनवार विधान परिषद उपनेतेपदी तर के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी वड्डेट्टीवारांना पसंती

विधिमंळाचे पावसाळी अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. विखे-पाटील यांच्या जागी विधिमंडळ पक्षनेता म्हणून काँग्रेसने थोरात यांची नियुक्ती केली असली तरी आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता विदर्भातील आक्रमक आमदार विजय वड्डेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पसंती दर्शविली आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तब होईल.