
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. आज बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर पहिल्यांदाच थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
”माझा राजीनामा ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे. प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत”, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.




























































