जागतिक स्पर्धा हिंदुस्थानबाहेर हलवल्यास महसुलातील हिस्सा विसरा – बीसीसीआय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान सरकारचा कर भरावा लागू नये म्हणून 2021 चा टी -20 विश्वचषक आणि 2023 ची वन डे विश्वचषक स्पर्धा हिंदुस्थानबाहेर हलवण्याचे कारस्थान रचाल तर आमच्या महसुलातील तुमचा हिस्सा विसरा ,असा इशाराच बीसीसीआयने मंगळवारी आयसीसीला दिला.

दुबईत नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी कार्यकारी समिती बैठकीत हिंदुस्थान सरकारच्या मोठ्या कराचा बोजा (सुमारे 149 कोटी रुपये ) 2021 चा टी -20 वर्ल्ड कप आणि 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सोसावा लागणार असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या स्पर्धा हिंदुस्थानबाहेर हलवण्याचाही विचार होऊ लागला आहे. तसे घडल्यास बीसीसीआय आपल्या महसुलातील एक छदामही आयसीसीला देणार नसल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आयसीसी हिंदुस्थानी कर वाचविण्यासाठी आमच्या यजमानपदाखालील नियोजित जागतिक क्रिकेट स्पर्धा देशाबाहेर हलवण्याचा विचार करत असेल तर आमची हरकत नाही. पण अशा दबावाने सरकारी करांबाबतची समस्या सुटणार नाही हे आयसीसीने लक्षात ठेवावे. आम्ही आमचे अर्थ मंत्रालय आणि कर विभागाशी स्पर्धेवरील करांत सवलत मिळावी म्हणून बोलणार आहोत. पण आयसीसी जर आमच्या वाट्याच्या स्पर्धा अन्यत्र हलवण्याची कारवाई करेल तर त्यांनी पुढच्या परिणामांना तयार राहावे. आम्हाला भविष्यातील विश्वचषक या स्पर्धा हिंदुस्थानातच खेळवायच्या आहेत. त्या देशाबाहेर हलवल्यास आयसीसीला आमच्या महसुलातील हिस्स्यावर पाणी सोडावे लागेल ,असे स्पष्टीकरण बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केले आहे.

आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व सदस्य संघाना एकसमान वागणूक द्यायला हवी.बीसीसीआयबाबत पक्षपाती धोरण स्वीकारल्यास त्याचे परिणाम भोगण्याची तयारी मात्र आयसीसीने ठेवावी.
-बीसीसीआय