
सामना ऑनलाईन । मुंबई
जागतिक पातळीवर मुंबई पोलीस आज अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज बनले आहेत. पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील आवश्यक सेवासुविधांना आधुनिकतेची जोड देणारे मुंबई हे दशातील पहिले शहर असल्याचा नक्कीच अभिमान वाटतोय. पण आधुनिक झाला असलात तरी मूळ पोलीसिंगला तडा जाऊ देऊ नका. तुमची संवेदनशीलता विसरू नका. आपण नागरिकांची सेवा करण्यासाठी आहोत हे सदैव लक्षात ठेवा. पोलीस कसे असावेत तर ते मुंबई पोलिसांसारखे असावे असा गौरवाद्गार प्रत्येकाच्या तोंडून निघेल असे काम करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना केली.
झटपट व कोणत्याही कटकटीविना आणि पेपरलेस सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी मुंबई पोलीस अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज झाले आहे. पोलिसांनी तयार केलेल्या ‘डायल १००’, ‘एम पासपोर्ट’, ‘पोलीस दीदी’, ‘एमपीआयएस’, ‘एमपीएलएस’, ‘संवाद’ या सेवांचे आज मुंबई पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई पोलीस कात टाकत असून सर्वांगीण सुसज्ज असे पोलीस दल बनले आहे. असे असले तरी पोलीस दल संवेदनशील असले पाहिजे. यामुळे केवळ आधुनिकतेच्या बाबतीतच नाही तर सर्व बाजूने मुंबई पोलीस दल मजबूत बनेल. पोलीस कसे असावेत असा जर दाखला द्यायचा झाला तर मुंबई पोलिसांचे नाव सर्वप्रथम आले पाहिजे असे निःस्वार्थपणे काम करा. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि रणजित पाटील, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, अमिन पटेल, भाई जगताप, अपर मुख्य सचिव (गृह) सुनील पोरवाल, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर तसेच आजी-माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डायल १०० अधिक सुसज्ज
आणीबाणीची वेळ असल्यास पोलिसांची मदत मिळविण्यासाठी१०० नंबरवर कॉल केला जातो. त्यानंतर काही मिनिटांतच पोलीस मदत मिळत होती. पण डायल १०० आणखी अत्याधुनिक करण्यात आले आहे. नव्या यंत्रणेमुळे १०० नंबरवर पोलीस मदत मिळवणे आणखी कमी वेळाचे व झटपट बनले आहे. १०० नंबरवर कॉल केल्यानंतर पोलिसांना कॉलरचे लोकेशन मिळते. कुठे मदत हवी तेथील स्थानिक पोलिसांना लगेच कळवून घटनास्थळी पाठविता येते. त्यामुळे नागरिकांना झटपट मदत मिळत असून एम पासपोर्टचादेखील असाच नागरिकांना फायदा मिळत असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले.
























































