सहा उड्डाणपुलांखालच्या जागांचे सुशोभीकरण; 19 खांबांवर ‘व्हर्टिकल गार्डन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

उड्डाणपुलांखालच्या रिकाम्या जागा सुशोभित करण्याचे पालिकेने ठरवले आहे. शहर भागातील सहा उड्डाणपुलांखाली उद्याने बनवण्यात येणार आहेत. यात हिंदमाता उड्डाणपूल,एलफिन्स्टन उड्डाणपूल व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील उड्डाणपुलाखाली उद्याने साकारण्यात येणार आहेत. तर अन्य तीन उड्डाणपुलांखालील खांबांवर व्हर्टिकल गार्डन साकारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागाने शहर भागातील 6 उड्डाणपुलांखाली अभिनव उद्याने विकसित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये हिंदमाता उड्डाणपूल, एलफिन्स्टन उड्डाणपूल व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील 3 उड्डाणपुलांखाली 31 हजार 213 चौरस फुटांच्या जागेत विविध सोयीसुविधा असणारी 3 उद्याने साकारण्यात येणार आहेत. या उद्यानांमध्ये विविध रंगांच्या एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या सहा उद्यानांच्या उभारणीसाठी रुपये 4 कोटी 96 लाख एवढा खर्च अंदाजित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

हिंदमाता उड्डाणपुलाखाली स्केटिंग रिंग

 ‘एफ दक्षिण’ विभागतील हिंदमाता उड्डाणपुलाच्या खाली असणाऱ्या सुमारे 12 हजार 916 चौरस फुटांच्या जागेतील उद्यानात ‘स्केटिंग रिंग’ बनवण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील लहान मुलांना व युवकांना ‘स्केटिंग’ या क्रीडा प्रकाराचा सराव करता येईल. ‘जी दक्षिण’ विभागातील परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखाली असणाऱ्या सुमारे 10 हजार 763 चौरस फुटांच्या जागेत उद्यान साकारले जाणार आहे. तसेच वरळी परिसरातील डॉ. हेडगेवार चौक येथील डॉ. ऍनी बेझंट मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालील 7 हजार 534 चौरस फुटांच्या जागेत एक उद्यान साकारले जाणार आहे.

‘बी’ विभागात असणारा ‘कुतूब-ए-कोकण मगदूमअली माहिमी उड्डाणपूल’ (जे.जे.फ्लायओव्हर), ‘इ’विभागातील’ वाय ब्रिज’ (खडा पारशी उड्डाणपूल) व ‘जी उत्तर’ विभागातील कवी केशवसुत उड्डाणपुल या 3 उड्डाणपुलांच्या खालील 19 खांबांवर(Pillars) ‘उभी उद्याने’ अर्थात ‘व्हर्टिकल गार्डन’साकारण्यात येणार आहे. या उद्यानांच्या सभोवताली विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई व सुरक्षेच्या दृष्टीने कुंपणही केले जाणार आहे.