
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड आवर्जून खाल्लं जातंच. कलिंगडात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहाण्यासाठी कलिंगड खाणं आवश्यक आहे. कलिंगडात जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर कलिंगड खाण्यासोबतच चेहऱ्याला लावणं हाही उत्तम उपाय आहे, मात्र हे फारच कमी जणांना माहित असेल. कलिंगडाचा वापर त्वचेसाठी केल्यास उन्हाळ्यात त्वचेवर येणारी पुरळ, त्वचेचा होणारा दाह या समस्या दूर होतात. त्वचेला थंडावा, आर्द्रता मिळते.
कलिंगडात क जीवनसत्त्व असतं. यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. कलिंगडाच्या लाल, थंडगार गराने चेहऱ्याचा मसाज केल्यास त्वचेवरची रंध्र मोकळी होतात. कलिंगडातील पाण्यामुळे त्वचेतील हरवलेली आर्द्रता परत मिळवता येते. कलिंगड चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते. चेहरा ताजातवाना होतो. उन्हाळ्याच्या दिवसात कूल राहाण्यासोबतच कूल दिसायचंही असेल तर कलिंगडचं फेशियल अवश्य करायला हवं.
कलिंगड फेशियल कसं कराल ?
– कलिंगडाचं फेशियल करताना आधी चेहरा स्वच्छ करावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी कलिंगडाच्या रसात थोडं खोबऱ्याचं तेल घालून क्लीन्जर तयार करावं. या मिश्रणानं चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.
– त्यानंतर क्लीन्जरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा खोलवर स्वच्छ होण्यासाठी कलिंगडानेच स्क्रब करणं आवश्यक आहे. यासाठी 2 चमचे कलिंगडाचा रस आणि त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घाला. या मिश्रणानं चेहऱ्यावर हळुवार आणि गोलाकार हात फिरवून मसाज करत करत स्क्रब करा. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा, ब्लॅकहेडस, व्हाइटहेड्स निघून जातील.
– आता कलिंगडाच्या स्क्रबनं त्वचा खोलवर स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला छान मसाज मिळेल. त्यानंतर कलिंगडापासून क्रीम तयार करायचे आहे. याकरिता 1 चमचा कलिंगडाचा रस, अर्धा चमचा मध, थोडा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्या. हे सगळे पदार्थ एकजीव करा. या मिश्रणाने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह वाढायला मदत होईल. चेहऱ्याची त्वचा तजेलदार होईल.
– शेवटी त्वचेला कलिंगडचा फेसपॅक लावायचा आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा दूध, अर्धा चमचा कलिंगडाचा रस घ्यावा. हे मिश्रण मिसळून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावावा. तो 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून तो सुकू द्या. नंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. कलिंगडाच्या या फेशिअलमुळे उन्हानं आलेला काळवंडलेला चेहरा उजळ आणि तजेलदार दिसेल.



























































