
सामना प्रतिनिधी। बीड
संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 अ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर गटाचे उमेदवार मोमीन खमरूनिस्सा शरीफोद्दीन या सर्वाधिक 1019 मते घेऊन 315 मताधिक्क्याने विजयी झाल्या. महत्वाचे हे की, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फॉर्म हा संदीप क्षीरसागर यांना दिला होता. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी या प्रभागात अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरवला होता. रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज सोमवारी (28) सकाळी नगरपालिकेत मतमोजणी झाली. अंतिम निकाल हाती आला तेव्हा संदीप क्षीरसागर गटाचे उमेदवार 315 मताधिक्क्याने विजयी घोषित करण्यात आले. निकाल जाहीर होताच संदीप क्षीरसागर समर्थकांनी एकच जयघोष करत गुलालाची उधळण केली. पुतण्याने या पोटनिवडणुकीत काकांना धोबीपछाड दिल्याचे हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
बहुचर्चित बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकुण सात उमेदवारांमध्ये लढत पहायला मिळाली. या प्रभागात एकुण 3138 इतके मतदान असून रविवारी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व व्यंकटेश पब्लिक स्कुल येथील चार मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली तेव्हा एकुण 2511 (60.68 टक्के) इतके मतदान झाले होते. त्यानंतर आज सोमवारी सकाळी पालिका सभागृहात मतमोजणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस संदीप क्षीरसागर गटाच्या उमेदवार मोमीन खमरूनिसा शरीफोद्दीन या सर्वाधिक 1039 मते घेवून निवडून आल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार शेख समीराबेगम खमर यांचा 285 मतांनी पराभव केला. शेख समीरा बेगम यांना 754 मते मिळाली, एक नगरसेवक निवडून देण्यासाठी झालेली ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या उमेदवारांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमुळे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काका-पुतण्यांनी आपली प्रचार यंत्रणा कामाला लावली होती. त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या या लढतीत कोणाचा विजय होणार याकडे बीडसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र अंतिम निकाल आज हाती आल्यानंतर राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर गटाच्या उमेदवार मोमीन खमरूनिसा शरीफोद्दीन या विक्रमी मते घेवून निवडून आल्या. या विजयामुळे संदीप क्षीरसागर समर्थकांमध्ये आनंदाला उधाण आले असून पक्षाने टाकलेला विश्वास संदीप क्षीरसागर यांनी या निमित्ताने सार्थ ठरवला आहे.

































































