मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांना उदंड प्रतिसाद; प्रवेशाची सोडत लवकरच जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यंदा नर्सरी ते सहावीच्या एकूण 3 हजार 760 जागांसाठी तब्बल 9 हजार 524 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली असून आता अर्जाची छाननी सुरू आहे. लवकरच प्रवेशाची सोडत महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर केली जाणार आहे.

राज्याचे मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी माहीम व जोगेश्वरी येथे सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. यात यंदा नव्या दहा शाळांची भर पडली असून या शाळांच्या एकूणच पायाभूत सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड गुणवत्तेनुसार  करण्यात आल्याने या शाळांना पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी मोठी पसंती दाखवली आहे.

मुंबई पब्लिक स्कूल नावाने सुरू करण्यात आलेल्या या शाळांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती, पण पालकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता ही मुदत 24 मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. काही शाळांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा प्रवेश अर्ज कमी आले आहेत. अशा शाळांमध्ये प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे.

मुंबई पब्लिक स्कूलची वैशिष्टय़े

  • शाळा सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांनी सज्ज. यात संगीत नृत्य वर्ग, डिजिटल वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोगशाळांचा समावेश
  • सीबीएसईच्या धर्तीवर सजावटी, ई-लर्निंग, खेळाचे मैदान, संरक्षक भिंत, आणि प्रत्येक वर्गात चित्रमय सजावटी, शिक्षणविषयक माहिती आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी खास असे मंच तयार करण्यात आले आहेत.

या वर्गात होत आहेत प्रवेश…

मुंबई पब्लिक स्कूलच्या या शाळेत यंदापासून मुंबईतील पालकांना आपल्या पाल्यांसाठी छोटा-शिशु, मोठा-शिशु, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी या वर्गात प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येतील.

वर्गनिहाय प्रवेशक्षमता व आलेले अर्ज

वर्ग                    प्रवेश अर्ज               उपलब्ध जागा

नर्सरी                    715                       480

ज्युनियर केजी           2523                     480

सीनियर केजी           1421                     400

पहिली                   1716                    400

दुसरी                     844                    400

तिसरी                    710                    400

चौथी                     623                   400

पाचवी                   576                    400

सहावी                  395                     400