भवानी तलवार प्रगटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजीवनी धुरी-जाधव[email protected]

ज्या तलवारीने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक पराक्रम पाहिले… ती तलवार म्हणजे भवानी तलवार… आज ही तलवार प्रत्यक्षात आपल्याकडे नाही, पण शिवभक्तांना ही तलवार पाहता यावी यासाठी इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव यांनी या तलवारीची प्रतिकृती साकारली आहे…

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार म्हणजे भवानी देवीने दिलेली तलवार असा आपल्याकडे समज आहे. पण खरे तर 7 मार्च 1659 बांदा बंदरामध्ये पोर्तुगीजांचे एक जहाज ओहोटीमध्ये अडकून पडले. त्यावेळी कोकणातले सुभेदार अंबाजी सावंत यांनी त्या जहाजावर हल्ला केला. त्यावेळी तिथे त्यांना एक अप्रतिम तलवार सापडली. ही तलवार म्हणजेच भवानी तलवार. ही तलवार दोनच प्रकारे हिंदुस्थानात आली असावी. एक तर एखाद्या राजाला विकण्यासाठी किंवा एखाद्या राजाने त्यांना व्यापाराचा परवाना दिला असेल तर त्याला भेट म्हणून नजराणा देण्यासाठी ही अप्रतिम तलवार होती. तिची मूठ सोन्याची असून त्यावर सुंदर नक्षीकाम होते. अंबाजी सावंत यांनी ही तलवार मग आपल्या घरी आणल्यानंतर पुढे शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये दौरा झाला. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांना घरी बोलावले. त्यांच्या घरात असलेल्या भवानी देवीच्या देव्हाऱ्यात ही तलवार ठेवली होती. तिथून ती उचलून त्यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी ती महाराजांना नजराणा म्हणून भेट दिली. म्हणून तिला ‘भवानी तलवार’ असे नाव पडल्याचे नामदेवराव जाधव सांगतात.

bhavani-2

या तलवारीचे वर्णन करताना ते म्हणतात, या तलवारीचे ब्लेड स्टेनलेस धातूपासून तयार केलेले आहे. या धातूला दोनशे ते तीनशे वर्ष गंज लागत नाही. त्याचे आयुष्य मोठे आहे, त्याला धार चांगली असून ती कमाणी धातूपासून तयार करण्यात आली आहे. 1 हजार 200 ग्रॅम वजनाची ही तलवार आहे. साडेचार फूट लांबीची ही तलवार आहे. वजनाने हलकी, लवचिक आणि लांबीला जास्त अशी तिची रचना आहे.

भवानी तलवारीविषयी आणखी माहिती देताना जाधव सांगतात, ब्रिटिशांनी इथल्या सगळ्या दुर्मिळ, ऐतिहासिक गोष्टी नजराण्याच्या नावाखाली गडप करू नयेत यासाठी 1872 मध्ये तत्कालीन मराठे आणि इंग्रज आणि हिंदुस्थानातील लहान मोठे राजे यांच्यात तह झाला होता. असा तह असतानाही 1872 साली कोल्हापूरच्या राजे शाहू महाराजांकडून ब्रिटिशांनी दोन तलवारी बक्षीस म्हणून घेतल्या. त्यावेळी ज्या त्यांना नजर करण्यात आल्या त्या ‘तुळजा’ आणि ‘जगदंबा’ तलवारी होत्या. अधिकृत माहितीनुसार या दोन्ही तलवारी इंग्रजांकडे आहेत, तर स्वाभाविकच आपली तिसरी तलवारही त्यांच्याकडेच असण्याची दाट शक्यता आहे. कारण जर हिंदुस्थानात कोणाकडे ती तलवार असती तर ती एवढे दिवस गुप्त राहिली नसती. आम्ही आमचा पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर त्यांनी भवानी तलवार हा अल्बर्ट म्युझियमचा अविभाज्य भाग असल्याने आम्ही ती परत करू शकत नाही असे स्पष्ट केल्याचे ते सांगतात.

अशी आहे ही तलवार…

शिवाजी महाराजांनी वापरलेल्या भवानी तलवारीप्रमाणेच ही तलवार साडेचार फूट लांबीची असून तिचे वजन 1200 ग्रॅम आहे. तीन तोळे सोने व पोलादामधील कमानी या धातूचा वापर करून ही लवचिक तलवार पुण्यातील सत्यजित वैद्य यांनी बनवली आहे. त्या मुलाने त्याचा कसून अभ्यास केल्यावर त्याच्यावर आम्ही जबाबदारी दिली. त्या तरुणाने ही तलवार करण्याआधी विविध मॉडेल तयार करुन पाहिले. त्यानंतर सोन्याची तलवार बनवायला घेतली. ती बनविण्यासाठी चार महिने लागले असून सध्या ती माझ्या घरी असल्याचे नामदेवराव सांगतात.

प्रतिकृती करण्यामागचा हेतू…

भवानी तलवार हिंदुस्थानात येणार नसली तरी ती नेमकी होती कशी ते तरी शिवभक्तांना पाहायला मिळायला पाहिजे. ब्रिटिशांच्या म्युझियममध्ये असलेल्या जगदंब तलवारीची काही छायाचित्रे आणि चित्रफित आमच्यापर्यंत अनेक प्रयत्नांनंतर आले आहे. त्या छायाचित्रांचा योग्य अभ्यास करून त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जगदंबा, तुळजा आणि भवानी या तलवारी जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांची रुंदी, वजन सारखे आहे. फक्त त्यांच्या मुठीवरचे डिझाइन वेगळे असून त्याची मूठ सोन्याची आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तरी किमान प्रतिकृती शिवभक्तांना पाहता यावी असा त्यामागचा हेतू असल्याचे नामदेवराव सांगतात.

भवानी तलवार पाहायला मिळणार

सध्या ही तलवार नामदेवराव जाधव यांच्या निवासस्थानी आहे. 6 फेब्रुवारीपासून जगभरात ‘भवानी तलवार दर्शन सोहळा’ करण्यात येणार आहे. या दिवशी ठाण्यातील दिवा येथे पहिला भवानी तलवार दर्शन सोहळा आहे. ती तलवार सोन्याची आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तसेच 1 ते 10 मे मॉरिशस देशात भवानी दर्शन सोहळे करण्यात येतील.

खरी तलवार मिळेपर्यंत पाठपुरावा

यासंदर्भात राष्ट्रपतींकडे पाठपुरावा सुरू आहे. सरकारने याला सकारात्मक पाठिंबा दिला तर नक्कीच ब्रिटिश सरकार जगासमोर उघडे पडेल आणि त्यांना ती तलवार परत द्यावी लागेल. आपण जनमानसाचा एवढा रेटा उभा करणार आहोत. जेणेकरून राजकीय दबाव संसदेत पडून तो ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, असे नामदेवराव यांनी सांगितले.