‘भारत पे’चे सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप, हकालपट्टी होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर शार्क टँक इंडिया हा कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमात एक वेगळी ओळख बनवणारे भारत पे या अॅप्लिकेशनचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप करण्यात आला आहे. भारत पे कंपनीच्या प्रशासकीय समितीने त्यांना तीन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं असून त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.

भारत पे या कंपनीच्या प्रशासनाने त्यांच्याविरोधात चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने नेमलेली एक ऑडिट कंपनी या प्रकाराची चौकशी करणार आहे. अशनीरसह त्यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. आता त्यांना व्यवस्थापकीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याचा आरोप ग्रोव्हर यांनी केला आहे.

कोटक सिक्युरिटीजच्या कर्मचाऱ्यासोबतची त्यांची तथाकथित ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येताच त्यांना तीन महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं. पण, हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. ग्रोव्हर यांच्या म्हणण्यानुसार आता या कंपनीतील गुंतवणूकदार आपल्या विरोधात गेले असून आपल्याला आपणच स्थापन केलेल्या कंपनीच्या बाहेर काढण्याचा त्यांचा बेत आहे.

त्यामुळे ग्रोव्हर यांनीही ही लढाई कायदेशीर मार्गाने लढायचा निर्णय घेतला असून त्यासाठी तीन कायद्याशी संबंधित फर्मची नेमणूक केली आहे. कंपनीने आपली पुन्हा नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते शक्य नसल्यास आपल्याला कंपनीतील भागीदारीचा हिस्सा म्हणजेच 4 हजार कोटी रुपये मिळावेत, असंही ग्रोव्हर यांचं म्हणणं आहे. ग्रोव्हर यांचा कंपनीतील हिस्सा 9 टक्के इतका आहे. त्यानुसार हे पैसे आपल्याला देण्यात यावेत असं ग्रोव्हर यांचं म्हणणं आहे.