भटकंती- गूढ आणि रम्य पाटेश्वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शंतनू परांजपे

सातारा शहरापासून 14 किमीवर देवाक हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पाटेश्वराचे अप्रतिम मंदिर व लेणी आहेत. पाटेश्वरचे वैशिष्टय़ म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित ’शिवपिंडी’. येथे बोटाच्या पेराएवढय़ा लहान आकारापासून ते अंदाजे 4 फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. पिंडींच्या कोरीवकामातही विविधता आढळते. सातारा शहराच्या जवळ असणाऱया या निसर्गरम्य ठिकाणी अनेक पक्षीही पाहायला मिळतात. साताऱयाची ओळख असणाऱया अजिंक्यतारा आणि कासच्या पठाराबरोबर पाटेश्वरही पाहण्यासारखे ठिकाण आहे.

महाराष्ट्रावर अनेक राजसत्तांनी राज्य केले. यातील अनेक राजसत्ता या हिंदू होत्या, जसे की राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, यादव इत्यादी. या सर्व राजसत्तांनी महाराष्ट्रातील कलावैभवात भर टाकली ती म्हणजे मंदिरांच्या रूपाने. शिलाहार, चालुक्य आणि यादव या काळात महाराष्ट्रात असंख्य मंदिरांची निर्मिती झाली. त्यात मग अंबरनाथचे शिवमंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर, सिन्नरचे गोंदेश्वर ही भव्य दिव्य मंदिरे आपल्याला दिसून येतात. पुढे मग मुसलमानी आक्रमणात या कलेला थोडी ओहोटी लागली आणि नंतरचा बराचसा काळ हा रणधुमाळीतच गेला. पुढे शाहू महाराज गादीवर आल्यानंतर पेशव्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला स्थैर्य लाभले आणि पुन्हा एकदा मंदिरे उभारण्याच्या कलेने जोर धरला.

महाराष्ट्रात जशी प्रसिद्ध मंदिरे आहे तशीच अनेक अप्रसिद्ध व आडवाटेला असलेली मंदिरे पर्यटकांची वाट पाहत आहेत. आजच्या लेखातले हे मंदिर म्हणजे असेच एका आडवाटेला जंगलात असणारे पाटेश्वरचे शिवमंदिर आणि त्या मंदिराच्या परिसरात असणारी काही लेणी मंदिरे. साताऱयापासून साधारणपणे आग्नेयेला 11 कि.मी. वर हे सुंदर निसर्गरम्य स्थान डोंगराच्या कुशीमध्ये अनेक आश्चर्य घेऊन लपून बसलेले आहे. फारसा लोकांचा वावर नसलेले पाटेश्वर मुळात प्रसिद्ध आहे ते शाक्तपंथीयांच्या लेण्यांसाठी. मंदिराच्या वाटेवर अर्ध्यापर्यंत घाटरस्ता आहे व पुढचे अंतर हे पायीच कापावे लागते. मात्र वाट जंगलातील असल्याने या वाटेत आपल्याला थोडेफार पक्षीनिरीक्षणदेखील करता येते.

गाडी लावून थोडेसे अंतर चालून गेले की, दारातच असलेला एक गणपती आपले स्वागत करतो. गणपतीच्या आजूबाजूला रिद्धीसिद्धी वाटतील अशा दोन स्त्रिया हातात चवऱया घेऊन उभ्या असलेल्या दिसून येतात. येथून मग काही पायऱया चढल्या की, साधारण 2 कि.मी. लांबीची सपाट जंगलातील वाट आपल्याला पाटेश्वर मंदिराजवळ घेऊन जाते. पाटेश्वर मंदिराजवळ पोहोचले की, एक पाण्याचे मोठे कुंड लागते. या कुंडाच्या समोरच साधूबाबांचा मोठा आश्रमसुद्धा आहे. येथील नितांत शांतता आपल्याला मोहून टाकते. कुंडाच्या शेजारून काही पायऱया चढून गेले की येते ते म्हणजे पाटेश्वराचे मंदिर. पाटेश्वर मंदिर हे कदाचित यादवकाळात बांधले गेलेले मंदिर असावे असे प्रथमदर्शनी वाटते. पुढे मराठय़ांच्या काळात अहिल्याबाई होळकर आणि सरदार अनगळ यांनी पाटेश्वर मंदिराच्या दुरुस्तीसाठी मदत केल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. मंदिराचा कळस हा मात्र पेशवेकाळातील आहे. मंदिराचे आवार बरेच मोठे असून त्याच्या सभोवताली दगडी तटबंदी आहे.

मंदिराच्या समोर सुंदर असा नंदी मंडप आहे तसेच आवारात चार तोंडांच्या ब्रह्माचे तसेच महिषासुरमर्दिनीचे शिल्पसुद्धा दिसून येते. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला अनेक देवतांची शिल्पे दिसून येतात. यात एक महत्त्वाचे शिल्प आहे ते म्हणजे वैनायकीचे. वैनायकी म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर स्त्री गणपती. महाराष्ट्रात पाटेश्वर, भुलेश्वर, अंबाजोगाई येथे ही स्त्री गणेशाची शिल्पे आढळून येतात. मंदिरफेरीला साधारण एक तास पुरतो. आल्या पावली परत येत, वाटेत लागणारी शिल्पे बघत आपण पुन्हा येऊन पोहोचतो ते पुन्हा पाण्याच्या कुंडाजवळ. पाटेश्वर या ठिकाणाची खरी मजा ही आता इथे सुरू होते.

याच कुंडापासून खाली गेलो की लागतो तो पहिला लेणीसमूह. साधारण नवव्या-दहाव्या शतकात या लेण्या शाक्तपंथीयांनी खोदल्या असाव्यात असे अभ्यासकांचे मत आहे. यातील सर्व लेण्यांमध्ये शंकराच्या मोठमोठय़ा पिंडय़ा आपल्या दिसून येतात. पहिल्या लेणीसमूहाच्या इथे तर शिल्पांची रेलचेल आहे. यातील प्रत्येक शिल्पावर एक संपूर्ण लेख लिहिता येईल. या शिल्पांमध्ये त्रिपुरा शिल्पपट, अग्नी आणि बैल यांचे संयुक्त शिल्प असणारे अग्निवृष, सुरसुंदरी, दशावताराचे शिल्प अशी अनेक शिल्पे आहेत.

या लेण्या पाहून झाल्यावर मग आपली पावले वळतात ती पुढील लेणीसमूहाकडे. वाटेत लागणारी दोन छोटी मंदिरे बघत आपण येऊन पोहोचतो ते वऱहाडघर लेणीसमूहात. या लेण्या मूळच्या दगडात कोरलेल्या असून त्यांच्याभोवती दिसणारे बांधकाम हे नंतरच्या काळात केले आहे. त्यामुळे या लेण्यांना आज मंदिरासारखे स्वरूप आले आहे. लेण्यांच्या बाहेर एक सुंदर अशी दीपमाळ आहे. लेण्यांत प्रवेश करताना एक अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेला नंदी आपले स्वागत करतो. नंदी ओलांडून पुढे गेलं की, एक चौक लागतो. येथे तीन लेण्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. पैकी मधली लेणी सर्वात अलंकृत आहे. उजवीकडच्या लेण्यामध्ये शंकराच्या पिंडय़ा असून फारसे कोरीवकाम केलेले आपल्याला आढळून येत नाही, तर डावीकडच्या लेण्यामध्येसुद्धा सध्या शंकराच्या विविध प्रकारच्या पिंडय़ा ठेवल्या आहेत. मधले लेणे मात्र अतिशय सुंदर आहे. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना यांची शिल्पे आपल्याला कोरलेली दिसून येतात. तसेच प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला कुंभेश्वर तसेच चतुर्मुख शिवलिंगसुद्धा पाहायला मिळते. या लेण्यातील खांब हे अलंकृत आहेत तसेच त्यांच्यावर नागांच्या आकृत्या कोरल्या आहेत. या लेण्यामध्ये सहस्रलिंग, सप्तमातृका, सहस्रलिंग पट, नवग्रहलिंग तसेच इतर देवदेवता यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. यातील अनेक मूर्तींचा अर्थ अभ्यासकांनासुद्धा लागलेला नाही.

एकंदरीतच पाटेश्वरसारख्या गूढ, पण तितक्याच रम्य ठिकाणाची सफर ही आल्हाददायक होते आणि एक नितांतसुंदर ठिकाण पाहिल्याचा आनंद मनात बाळगत आपण परतीच्या मार्गाला लागलेले असतो.

>>[email protected]