
फ्रान्समध्ये ‘अल्ला हु अकबर’ चे नारे देत झालेल्या दहशतवादी हल्ल्या विरोधात येथील सरकार आक्रमक झाले असून कट्टर विचारसरणीच्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या कार्टूनवरून हा वाद सुरू झाला. आता फ्रान्स सरकारच्या विरोधात मध्य प्रदेश मधील भोपाळ येथील इकबाल मैदानावर मुस्लिमांनी रॅली काढत निषेध केला.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स सरकारच्या कारवाईचे समर्थन आणि हल्ल्याची निंदा केलेली असताना एक समाज त्याचा विरोध कसा करू शकतो? असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. याच दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी फ्रांसच्या राष्ट्रपती विरोधात हिंदुस्थानमधील मुस्लिम समाज प्रदर्शन करत आहे, याला दुर्भाग्यपूर्ण म्हंटले आहे. एका खासगी न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी सरकारने अशा कोणत्याही आंदोलनाला परवानगी देऊ नये असे म्हटले.
‘एकच समाज पुन्हा पुन्हा आग का भडकावतोय?’
पुन्हा पुन्हा एकच समाज येऊन आग का भडकावतोय?’, असा सवाल बाबा रामदेव यांनी उपस्थित केला. तसेच असे झाल्याने हिंदू समाज देखील याबाबत विचार करेल. तुम्ही तुमच्या मान्यतावर विश्वास ठेवा, मात्र संपूर्ण जगावर थोपवू नका. स्वतःबाबत दृढ विश्वास आणि दुसऱ्या बाबत उदारता ठेवा. स्वतःच्या धर्माशी एकनिष्ठ रहा, मात्र दुसऱ्याच्या धर्माचा देखील आदर करा, असे बाबा रामदेव म्हणाले.
‘धार्मिक उन्मादामुळे युद्ध’
बाबा रामदेव पुढे म्हणतात, धार्मिक उन्मादामुळे जगभरात युद्ध होतात. आजपर्यंत जगात जेवढी युद्ध झाली, त्याला धार्मिक उन्माद, धार्मिक महत्वकांक्षा कारणीभूत आहे. तसेच ते पुढे सवाल उपस्थित करतात की, पैगंबर मोहम्मद, इसा मसिह, गुरुनानक, भगवान महावीर, भगवान बुद्ध, भगवान श्रीराम, भगवान कृष्ण, भगवान भोलेनाथ यांनी किंवा महापुरुषांनी धार्मिक कट्टरतेबाबत सांगितले आहे का? कधीच नाही.
सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की, सर्व मानव एक समान आहेत. हिंसा तर लांबची गोष्ट कधी कोणाचे मन देखील दुखवू नका, असे त्यांनी सांगितले. मग हा तमाशा काय सुरू आहे? कसले प्रदर्शन सुरू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कार्टून बनवले म्हणून मुंडके उडवले जात आहे, लाखोंचा हिंसाचार करण्याच्या बाता केल्या जात आहेत. इतकी असहिष्णुता येते कुठून? धर्माच्या नावाखाली संहार करणे, खून करणे, इस्लाम कबूल केला नाही तर हत्या करणे एवढी विनाशकारी वृत्ती एकदिवस जगाला विनाशाच्या खाईत लोटेल असेही ते म्हणाले.
























































