
सामना प्रतिनिधी । जामखेड
रस्त्याअभावी वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांनी आपला जीव गमवला. ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्वातंत्र्यानंतर इतके दिवस होऊनही हा भाग विकासापासून वंचित राहिला. रस्त्याच्या मागणीसाठी मागील निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. तो योग्यच होता. मी शब्द देऊन बहिष्कार मागे घेण्यास लावले होते. आज तो शब्द रस्त्याचे भूमीपुजन करून पूर्ण केला आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील कोल्हेवाडी ते पिंपळवाडी फाटा या तीन कोटी ६२ लाख रुपये किमतीच्या ६.२ किलोमीटर रस्त्याचे भूमीपुजन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोतम उतेकर, रवी सुरवसे, सोमनाथ पाचरणे, सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, सोमनाथ राळेभात, सरपंच सदाशिव वराट, सरपंच शिवाजी डोंगरे, वामन डोंगरे, उपसरपंच वाल्मिक कोल्हे, दत्ता कोल्हे, रावसाहेब कोल्हे, सुभाष कोल्हे, सुदाम कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, बबन कोल्हे , राम कोल्हे, बळीराम कोल्हे, किरण कोल्हे, दादासाहेब मोहोते, दिलीप घोलप, गुलाब कोल्हे, बाबासाहेब कोल्हे, शिवाजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आतापर्यंतच्या पुढाऱ्यांनी उत्तरेच्या विकासावर जास्तीत जास्त भर दिला त्यामुळे कर्जत जामखेड विकासापासून दूर राहिले. स्वातंत्र्यानंतर इतके वर्षे झाली तरी गावात रस्ता नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रस्त्याअभावी अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील निवडणुकीत कोल्हेवाडी ग्रामस्थांनी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी रस्ता करतो असा शब्द दिला होता. त्यामुळे लोकांनी बहिष्कार मागे घेतला होता व मीही माझा शब्द खरा केला आहे. आता या रस्त्यामुळे परिसरातील लोकांची चांगली सोय होईल.
अनेक वर्षे विकासापासून कोसो दूर असणाऱ्या कर्जत जामखेड मधील विकासाचा अनुशेष मी भरून काढत आहे. रस्ते वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जामखेड तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.





























































