
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जोरदार दणका बसला आहे. कर्नाटकातील तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, ऐनदिवाळीतच ‘दिवाळे’ वाजले आहे. केवळ एक जागा भाजपला मिळाली आहे, तर काँग्रेस-जेडीएस आघाडीने चार जागांवर मोठा विजय मिळविला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यामुळे शिमोगा येथे पोटनिवडणूक झाली. येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांना भाजपने उमेदवारी दिली होती. राघवेंद्र यांनी 52148 मतांनी विजय मिळविला. जेडीएसचे मधू बंगारप्पा यांचा येथे पराभव झाला.
मंड्या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. जेडीएसचे एल. आर. शिवरामीगौडा यांनी तब्बल 324943 मतांनी भाजपचे सिद्धरामय्या यांचा पराभव केला. माजी सनदी अधिकारी असलेले सिद्धरामय्या यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. जमखंडी मतदारसंघ काँग्रेसने कायम राखला. सिद्धु न्यामागौडा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेसने त्यांचे पुत्र आनंद न्यामागौडा यांना उमेदवारी दिली. न्यामागौडा हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे श्रीकांत कुलकर्णी यांचा 39480 मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीतील विजयामुळे कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएस आघाडीचे संख्याबळ 120 झाले आहे. 224 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ 104 आहे.
- कर्नाटकातील बेल्लारी, शिमोगा आणि मंड्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. यातील बेल्लारी आणि शिमोगा लोकसभेच्या जागा भाजपकडे होत्या, तर मंड्या जेडीएसकडे होता. आता केवळ शिमोगा मतदारसंघ भाजपकडे राहिला. भाजपचा मोठा पराभव बेल्लारीत झाला आहे. भाजपची ही जागा खेचून घेत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला. मंड्याची जागा जेडीएसने कायम राखली.
- दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. रामनगर मतदारसंघात कुमारस्वामी यांची पत्नी अनिता या 109137 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे एल. चंद्रशेखर यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीच्या तोंडावर चंद्रशेखर यांनी पक्ष बदलला होता. काँग्रेसला सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
- 2004 पासून बेल्लारी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. खाण घोटाळ्यातील रेड्डी बंधूंचे येथे वर्चस्व आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत जे. शांता यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार व्ही. एस. उग्रप्पा यांनी तब्बल 2.4 लाख मतांनी भाजपच्या जे. शांता यांचा दारुण पराभव केला. रेड्डी बंधूंचे निकटवर्तीय बी. श्रीरामालू यांची बहीण जे. शांता आहेत. हा पराभव भाजपसाठी झटका आहे.

























































