बिहारच्या आरा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, 80 लोकांचा घेतला चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या आरा शहरात सध्या कुत्र्याची दहशत पसरली आहे. या भटक्या कुत्र्याने शहरातील 80 लोकांवर हल्ला केला आहे. शिवगंज, शीतला टोला , महादेव रोड आणि जवळच्या रुग्णालय परिसरात बुधवारी 80 लोकांचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दहा ते बारा लहान मुलांचा समावेश आहे.

आरा शहरात सायंकाळी 7.30 च्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे 80 जणांना चावा घेतला आहे. केजी रोड, महाराजा कॉलेज सदर हॉस्पिटल रोड, महादेवा, शिवगंज, मोती टोला या गजबजलेल्या भागातील बाजारपेठेतून जाणाऱ्या लोकांवर या कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेची माहिती मिळताच आरा महानगरपालिकेने कारवाई केली असून शहर व्यवस्थापक ओम प्रकाश पथकासह कुत्र्याच्या शोधात शहरातील विविध भागात फिरत आहेत.

जखमी विविध परिसरातील लोकं आहेत. जखमी रीना देवी या महिलेने सांगितले की, त्या आपल्या ड्युटीवरुन घरी परतत असताना शिवगंज परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आरा सदर रुग्णालयात आणण्यात आले. तर दुसरीकडे जखमी हिमांशू कुमार वर्मा हा एका लग्न समारंभासाठी मित्राच्या घरी जात होते. त्यामुळे शिवगंजजवळ त्याच कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतरच तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातही आणण्यात आले.

रुग्णालयातील आपत्कालीन विभागात पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती होती. या रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचार केले जात आहेत. लहान मुले, वृद्ध, महिला, सर्व प्रकारच्या लोकांना कुत्र्याने भक्ष्य बनवले आहे. याच घटनेची माहिती मिळताच नगर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि एएसपी आरा हिमांशू यांनी रुग्णालयात पोहोचून लोकांची स्थिती जाणून घेतली.