नक्षलवाद्यांची क्रूरता, एकाच घरातील चौघांना दिली फाशी, बॉम्बने उडवले घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

बिहारमधील गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अतिशय क्रूर कार्य केले आहे. गया जिल्ह्यातील मोनबार गावातील एका घरातल्या चौघांना नक्षलवाद्यांनी फासावर लटकवले व त्यानंतर त्याचे घर बॉम्बने उडवून लावले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या घराजवळ एक पत्रक चिकटवत त्यांनी असे का केले त्याचे कारण लिहले आहे.

मोनबार गावात राहणाऱ्या सरजू सिंह भोक्ता, त्यांची पत्नी निरोशा भोक्ता, मुलगे सतेंदर व महेंदर भोक्ता यांचे मृतदेह त्यांच्याच घराबाहेरील एका झाडाला लटकलेले होते व त्यांचे घर नक्षलवाद्यांनी बॉम्बने उडवून लावलेले होते. त्यांच्या घराबाहेर एक पत्रक नक्षलवाद्यांनी लावले होते त्यात त्यांनी ‘या कुटुंबाने आमच्या चार साथिदरांच्या जेवणात विष मिसळून त्यांची हत्या केली होती. त्याचा बदला आज आम्ही घेतला आहे’, असे नक्षलवाद्यांनी लिहले होते.

वर्षभरापूर्वी पोलीस चकमकीत अमरेश कुमार, सीता कुमार, शिवपूजन कुमार व उदय कुमार या चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र नक्षलवाद्यांनी त्या चौघांचा मृत्यू चकमकीत नाही तर जेवणातून विष देऊन झाल्याचे म्हटले होते. भोक्ता कुटुंबाने त्यांना जेवणातून विष दिले व त्यानंतर जवानांच्या मदतीने त्यांचे एनकाऊंटर घडविले असे नक्षलवाद्यांचे म्हणने होते.