मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत; पेंग्वीनकडून घोषणा, एप्रिलमध्ये होणार प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रकाशित होणार आहे. पत्रकार सदगुरु पाटील आणि मायाभूषण नागवेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन देशात व परदेशातही नावाजलेल्या पेंग्वीन प्रकाशन संस्थेकडून करण्यात येणार आहे. पेंग्वीनने याबाबतची घोषणा सोमवारी केली. मनोहर पर्रीकर यांचा मंगळवारी पहिला स्मृतीदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर पेंग्विन रेण्डम हाऊसतर्फे पर्रीकरांवरील पुस्तक एप्रिलमध्ये वाचकांसाठी उपलब्ध होत असल्याचे पेंग्वीनच्या प्रकाशक मिली ऐश्वर्या यांनी जाहीर केले.

याआधी सदगुरु पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पर्रीकरांवरील पहिले पुस्तक लिहिले होते. यावेळी पाटील व नागवेकर यांनी मिळून पूर्ण नव्या पुस्तकाची निर्मिती पेंग्वीनसाठी केली आहे. ‘अॅन एक्स्ट्रा ऑर्डीनरी लाईफ : अ बायोग्राफी ऑफ पर्रीकर’ असे पुस्तकाचे नाव आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात पर्रीकर यांचे बालपण, त्यांची विद्यार्थीदशा, आयआयटीतील कामगिरी, मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री म्हणून कारकिर्द याबाबतची माहिती आहे. विशेष म्हणजे पर्रीकर यांचे बालपणीचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, काही टीकाकार यांच्याशी बोलून या पुस्तकात बरीच सचित्र आणि रंजक माहिती समाविष्ट केली आहे. पर्रीकर यांच्या कारकिर्दीचे तटस्थ असे रिपोर्टकार्ड म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल असे लेखकांनी सांगितले.