
राज्यसभेत नाही, किमान विधान परिषदेत माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांना संधी मिळेल अशी आशा होती. मात्र भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना उमेदवारी डावलत त्यांचा पत्ता कट केला आहे. एवढेच नाही तर, भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे आणि रयत क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी नाकारली आहे. पक्षाबाहेरून आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विधान परिषद निवडणुकीसाठी संधी देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा होती. विधान परिषदेत संधी मिळाली तर तिचं सोनं करू, असं वक्तव्यही त्यांनी अलीकडेच केलं होतं. परंतु राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावललं गेलं आहे. भाजपकडून विधान परिषदेवर गेलेल्या मित्र पक्षांच्या दोन सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मित्र पक्षाच्या एकाला तरी संधी दिली जाईल अशी चर्चा होती. त्यामध्ये सदाभाऊ खोत यांचे नावही चर्चेत होते. पण, एसटी आंदोलन, शेतकरी प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका घेणारे आणि सतत भाजपची पाठराखण करणारे खोत यांची डाळ काही शिजली नाही.
पक्ष संघटनेत काम करणाऱ्या तिघांना संधी
माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव 2019 च्या निकडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर पक्ष संघटनेत सक्रिय राहून काम करणाऱ्या शिंदे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. फडणवीस समर्थक आणि पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी असणारे श्रीकांत भारतीय, भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
पंकजा मुंडेंची पुढील भूमिका काय?
पंकजा मुंडे यांना संधी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा यांना उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र केंद्राने भविष्यातील काहीतरी विचार करून त्यांच्याबाबतचा निर्णय घेतला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
























































