नितीशकुमार दिल्लीत; बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री, भाजप आणि जेडीयूमध्ये झालेय डील

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाल्यास नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत, तर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीशकुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल. भाजप आणि जेडीयूमध्ये तसे डील झालेय, असा दावा राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी केला आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा यांनी नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे म्हटले आहे. भाजपसोबत नितीशकुमार यांचे डील झाले आहे. त्यानुसार त्यांच्या नावावर दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांची मते घेऊन नितीशकुमार यांना दिल्लीत सेट करून बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करायचे असे ठरले आहे. मात्र, बिहारचे लोक असे होऊ देणार नाहीत, असे कुशवाहा म्हणाले.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यापूर्की लालू प्रसाद यादव यांची 15 वर्षे सत्ता होती. या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या जनतेला निराश केले. गावांमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची अद्यापही वानवा आहे.

गरीब लोक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. बेरोजगार लोक यापूर्वी स्थलांतर करत होते. आजही करत आहेत. सत्ताधाऱयांनी केवळ राजकारण केल्यानेच जनतेच्या समस्या सुटल्या नाहीत, अशी टीकाही कुशवाहा यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या