
भाजपच्या एका नेत्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जयप्रकाश मजुमदार असं या नेत्याचे नाव असून ते बंगाल भाजपचे उपाध्यक्ष आहेत. मजुमदार हे करीमपूर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत. त्यांना ही मारहाण झाल्याने भाजपचे तिथले नेते चिंतेत पडले आहेत.
#WATCH West Bengal BJP Vice President and candidate for Karimpur bypoll, Joy Prakash Majumdar manhandled and kicked allegedly by TMC workers as voting is underway in the constituency. #WestBengal pic.twitter.com/Vpb5s14M5A
— ANI (@ANI) November 25, 2019
ANI या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मजमुदार हे गाडीतून बाहेर पडताच त्यांना घेरलं आणि थेट मारहाण करायलाच सुरुवात केली. मारहाण करताना त्यांना एकाने लाथ मारली ज्यामुळे ते रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पडले. विशेष बाब ही आहे की पोलीस घटनास्थळी असतानाही त्यांना मारहाण करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी मला वाचवण्यासाठी काहीच केलं नाही असा मजुमदार यांनी आरोप केला आहे.
मजुमदार यांनी सांगितले की त्यांनी एका बूथवर त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना सोडलं. काही मिनिटांमध्येच या कार्यकर्त्यांचे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अपहरण केल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की तृणमूल काँग्रेसचा नेता राजू मल्लिक हा रामनगरच्या गावकऱ्यांना धमकावत होता. आपण दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.
तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे करीमपूर मतदारसंघात शांततेत मतदान सुरू असताना मजुमदार यांनी तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठीच त्यांना मारहाण करण्यात आल्याचं या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याने मजमुदार यांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण केल्याचे आरोपही खोटे असल्याचं म्हटलं आहे.
























































