
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या बेकायदा बांधकामांवर मिंधे सरकार मेहेरबान झाले आहे. सांताक्रुझमधील कंबोज यांच्या चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. आश्चर्य म्हणजे ‘खास बाब’ म्हणून अशा प्रकारचा निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे उदाहरण म्हणून मानले जाऊ नये, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ येथील त्यांच्या घरात आणि कार्यालयात अनधिकृतपणे काही बदल केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्याप्रकरणी कंबोज यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. कंबोज यांच्या घराची, इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणीही करण्यात आली होती. मिंधे सरकार सत्तेवर येताच कंबोज यांनी हे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी नगरविकास खात्याकडे अपील केले होते.
आर्थिक घोटाळय़ांतही क्लीन चिट
मोहित कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 2011 ते 2015 दरम्यान 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती त्यासाठी वापरली गेली नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यांना डिसेंबर 2022 मध्ये क्लीन चिट देण्यात आली.

























































