बनावट कागदपत्रे बनवून मंदिर देवस्थानच्या जमिनी हडपल्या, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी, भावावर गुन्हा दाखल!

suresh-dhas

भर दुष्काळात जनावरांच्या चारापाण्यात भ्रष्टाचार करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क देवालाच फसवले आहे. बीड जिल्ह्यातील मंदिर देवस्थानच्या शेकडो एकर जमिनी आमदार धस यांनी बोगस व्यवहार करून हडपल्या. अगोदर गुन्हा दाखल करा नंतर तपास करा, असा आसूड उच्च न्यायालयाने ओढल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी आणि भावावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानच्या शेकडो एकर जमिनीचा हा घोटाळा आहे. आमदार सुरेश धस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तसेच महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जमिनी लाटल्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे या जमिनींचा व्यवहार करण्यात आला. यामध्ये देवस्थानच्या इनामी जमिनी, शासनाच्या मालकीच्या तसेच सहकार विभागाच्या जमिनींचाही समावेश आहे. यापैकी काही जमिनींवर प्लॉटिंग करण्यात आली आणि लाखो रुपयांना ते प्लॉट विकण्यात आले. मात्र हा सगळा व्यवहारच बोगस असल्याचे समोर आले आणि ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी आमदार धस यांच्यासह महसुली अधिकाऱ्यांविरोधात शिमगा केला.

सामाजिक कार्यकर्ते रामदास खाडे यांनी या जमीन घोटाळ्याला वाचा फोडली. अनेक वर्षांपासून खाडे यांनी कोणत्याही दडपशाहीला भीक न घालता आपला लढा चालू ठेवला. जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात आले. परंतु पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे खाडे यांनी न्यायालयात धाव घेतली. जमीन घोटाळ्यात अगोदर गुन्हा दाखल करा आणि नंतर तपास करा असा दणका उच्च न्यायालयाने दिला. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तसेच लाचलुचपत खात्याकडे करण्यात आलेली तक्रारच ग्राह्य धरण्यात यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आमदार धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचाच आदेश कायम ठेवला.

न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. महसुल प्रशासनाला हाताशी धरून देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा करण्यात आला. वक्फ बोर्डाच्या जमिनीचाही असाच घोटाळा झाला. परंतु त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. हिंदू देवस्थानच्या जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे याचिकाकर्ते रामदास खाडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर 29 नोव्हेंबर रोजी याचिकाकर्त्याची तक्रारच गुन्हा दाखल करण्यासाठी आधार समजण्यात यावी असे खंडपीठाने स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देवस्थानच्या जमीन हडपल्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी प्राजक्ता, भाऊ देविदास तसेच मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यासह 29 जणांवर आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या मंदिरांच्या इनामी जमिनी गिळल्या
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान मुर्शदपूर, विठोबा देवस्थान पांढरी, विठोबा देवस्थान खडकत, खंडोबा देवस्थान बेलगाव, श्री रामचंद्रड देवस्थान आष्टी, श्री रामचंद्र देवस्थान चिखली, श्रीराम मंदिर देवस्थान चिंचपूर, पिंपळेश्वर देवस्थान आष्टी या देवस्थानच्या जमिनी बोगस कागदपत्रे तयार करून हडप करण्यात आल्या. महसुल प्रशासनाला हाताशी धरून या जमिनींवर प्लॉट पाडून कोट्यवधींची कमाई करण्यात आली.