सरकारला बदनाम करण्यासाठी कांद्याचा मुद्दा वाढवला जातोय, भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

654

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कांद्याच्या भाववाढीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार विरेंद्र सिंह मस्त यांनी देखील एक वादग्रस्त विधान केले आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा वाढवला जातोय, असा आरोपच त्यांनी केला आहे. विरेंद्र सिंह यांनी त्यांच्या मतदारसंघात चक्क कांदा अवघ्या 25 रुपये किलोने विकला जात असल्याचा दावा केला आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभेत कांद्याच्या दरवाढिवरून चर्चा सुरू असताना खासदार विरेंद्र सिंह मस्त यांनी त्यांच्या बलिया मतदारसंघात कांदे 25 रुपये किलो या दराने विकले जात असल्याचे सांगितले आहे. ‘काही लोकं जाणूनबुजून कांद्याच्या दरवाढीचा बाऊ करत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी हा कट रचला जातोय. माझ्या मतदारसंघात कांदा 25 रुपये प्रती किलोने विकला जातोय.’, असे विरेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले.

कांदा दरवाढीने घराघरांचा अर्थसंकल्प कोलमडला आहे. जेवणातून कांदा गायब झालाय. देशात चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुडीत कर्जे व कांद्याच्या समस्येबाबत प्रश्न विचारला. त्यावर अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. त्यावर अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘आम्ही कांदा जास्त खातच नाही. त्यामुळे आम्हाला या महागाईचा त्रास झाला नाही, पण कांद्याचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. निर्यातीवर बंदी आहे. साठेबाजी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातेय. शिवाय जिथे कांदा उपलब्ध आहे तिथून जिथे गरज आहे अशा भागांत तो सुरक्षित पोहोचविण्याची व्यवस्थाही सरकार करतंय.’’

आपली प्रतिक्रिया द्या