कार्यकर्त्यांना सोडून विरोधकांना घेऊन फिरता, हे योग्य नाही! भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe patil

आपण भाजपचे खासदार असताना, पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांऐवजी चक्क विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन फिरता, हे योग्य नाही, अशी संतप्त भावना भाजपच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केली. यावर खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी प्रोटोकॉलचे नाव देत सारवासारव करत कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. दरम्यान, भाजपच्या आज झालेल्या बैठकीत ही अंतर्गत खदखद बाहेर आल्याने शहरात याची मोठी चर्चा सुरू होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (दि. 18) नगर शहरात येत असून, शनिवारी (दि. 19) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

तुम्ही शहरात उड्डाणपुलाची पाहणी केली, त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना सोबत घेऊन फिरलात. ते आपले विरोधक आहेत. त्यांच्यासोबत फिरणे कितपत योग्य आहे? ही गोष्ट पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला रुचलेली नाही. आपण शहरात भाजपचा आमदार होण्यासह महापालिकेत सत्ता आणण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, तुम्ही चक्क विरोधकांबरोबर फिरता? यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पदाधिकाऱयांनी केली.

यावर खासदार विखे म्हणाले, ‘उड्डाणपुलासाठी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांनी योगदान दिले. उड्डाणपूल बांधण्यासाठी सगळ्यांचीच मदत झाली आहे. शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना सांगणे आपले कर्तव्य आहे. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विचार केला जाईल. मात्र, मी उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार आमदारांना सोबत घेऊन गेलो होते. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी पुन्हा माफी मागतो’, असा खुलासा करत विखे यांनी बैठक आटोपती घेतली.

एकाच आठवडय़ात दुसऱयांदा माफीनामा

नगरच्या उड्डाणपुलाबद्दल बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांचे नाव घेतले नव्हते. यावरून त्यांच्यावर टीका होताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली होती, तर आज भाजपच्या बैठकीत राष्ट्रवादीशी घरोबा करणाऱया सुजय विखे यांना याचा चांगलाच फटका बसला. पक्षांतर्गत कलह उफाळून आल्यामुळे त्यांना एकाच आठवडय़ात दुसऱयांदा माफी मागण्याची वेळ आली आहे.