भाजपने मोदी सरकारपूर्वी ‘जीएसटी’ला विरोध का केला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘जीएसटी’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘इमानदारीचा उत्सव’ मानत असतील तर त्यांचे सरकार येण्यापूर्वीची पाच वर्षे भाजपने जीएसटीला विरोध का केला होता, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताज्या ‘मन की बात’मध्ये बोलताना जीएसटीला सचोटीचा आणि इमानदारीचा उत्सव आहे, असे म्हटले होते. त्यानंतर चिदंबरम यांनी सवालांचा भडिमार करत ट्विटरवरून मोदी यांच्यावर निशाणा साधला. जीएसटी अमलात येऊन एक वर्ष झाले. कर परतावा न केल्यामुळे लाखो व्यापारी आणि निर्यातदारांचा पैसा अडकून पडला आहे याची केंद्रातील भाजप सरकारला कल्पना आहे काय, असे चिदंबरम यांनी विचारले आहे. मोदी सरकार जीएसटीवर-३ बी या तात्पुरत्या फॉर्मचा वापर आणखी किती काळ करणार, तसे करणे कायदेशीरदृष्टय़ा वैध आहे काय, असा चिदंबरम यांचा सवाल आहे.