ब्लँकेट, स्केटर, गरम कपड्यांचे वाटप, ऐन थंडीत पाचशे गरीबांना मायेची ऊब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

राज्यात सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असताना उल्हासनगरमधील तरुणाईच्या ग्रुपने रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपणाऱ्या गोरगरीबांना ब्लँकेट, स्केटर, गरम कपड्यांचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणांचे जथ्थे शहरात दुचाकीकरून फिरत असताना दुसरीकडे थंडीने कुडकुडणाऱ्या पाचशे गरजूंना समाजभान जपणाऱ्या तरुणाईने पांघरूण दिल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कल्याण, अंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर भागात भीक मागून पोट भरणाऱ्या गोरगरीबांना राहण्यासाठी निवारा नसल्याने ते फुटपाथवरच संसार थाटून तिथेच झोपतात. थंडीत एखादी जुनी चादर अंगावर घेऊन ते कशीबशी रात्र काढतात. पहाटे शेकोटी करून थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण निवारा देऊ शकत नाही, मात्र उबदार कपडे देऊ शकतो, या लोकभावनेतून श्रीपाल मुथा, भरत भाटी, सचिन जैन, रोहन कोट, पप्पू भाटी यांच्या ग्रुपने गरीबांना ब्लँकेट वाटप केले तर वालधुनी येथील उल्हास बिरादरीच्या अनुष्का शर्मा, मोनिका दुसेजा, राखी बरुड यांनी आदिवासी पाड्यातील महिलांना ब्लँकेटचे वाटप केले. 10 जानेवारीपर्यंत ही तरुणाई दररोज रात्री बाहेर पडून गोरगरीबांना ब्लँकेटचे वाटप करणार आहे.