
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिका सभागृह, स्थायी समितीत नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला मुंबईतील खड्डय़ांना जबाबदार धरून चांगलेच धारेवर धरल्यानंतर आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.
जोरदार पावसामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य आहे, मात्र कंत्राटदारांचा बेजाबदारपणा आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईकरांना ‘खड्डय़ातून’ मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे गेल्या दोन स्थायी समितीच्या बैठका आणि महासभेत शिवसेनेसह सर्वपक्षीय चांगलेच आक्रमक झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी सर्वपक्षीयांनी केली. ठाण्याच्या आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम केल्याचे नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर आज खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांना रस्त्यावर उतरावे लागले.
तातडीने काम पूर्ण करा
पालिका आयुक्तांनी कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, माटुंगा, दादर, मुंबई सेंट्रल, ताडदेक, चिंचपोकळी आदी ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी केली. खड्डे बुजवण्याचे काम वेगाने करावे असे निर्देशही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. यावेळी उपआयुक्त रमेश पवार, नरेंद्र बर्डे, भारत मराठे, संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. दरम्यान, रस्त्याचे काम निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकणे आणि दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

























































