
माहुल येथील पालिकेच्या मैदानात वैद्यकीय ऑक्सिजन जम्बो सिलिंडर रिफिलिंग प्रकल्प पालिका उभारत आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दीड किलोमीटरच्या वाहिनीसह 4 कोटी रुपयांची यंत्रणा पालिकेला मोफत उपलब्ध करून दिली आहे. बीपीसीएल या प्रकल्पातून रोज 72 मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होते. त्यापैकी 10 ते 15 मेट्रिक टन वायू या प्रकल्पातून भरला जाणार आहे. सात घनमीटर क्षमतेचे सुमारे 60 सिलिंडर तासाभरात, तर आठ तासांत 500 जम्बो सिलिंडर भरता येणार आहेत.
मुंबई रिफायनरीने एक कॉम्प्रेसर, एक बफर व्हेसल, एक मॅनिपह्ल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश या प्रकल्पात केला आहे. त्यासोबत बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून पालिकेच्या जम्बो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनी बीपीसीएलने टाकली आहे. यंत्रणा व ही प्राणवायू वाहिनी मिळून सुमारे चार कोटी रुपयांचा हातभार बीपीसीएलने लावला आहे. अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी ही यंत्रे आज स्वीकारली. यावेळी बीपीसीएल मुंबई रिफायनरीचे कार्यकारी संचालक सुब्रमोनी अय्यर, मुख्य व्यवस्थापक एन. चंद्रशेखर तसेच इतर प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकल्पात पालिकेने दोन कॉम्प्रेसर, एक बफर व्हेसल, चार स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी करून प्रकल्पउभारणी सुरू केली आहे.
























































