पालिका शाळांचा निकाल 20 टक्क्यांनी घसरला, एकूण निकाल 53 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांचा निकाल यावर्षी तब्बल 20 टक्क्यांनी घसरला असून एकूण निकाल 53.14 टक्के लागला आहे. निकालात दोन शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 12 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत. पालिका शाळांमध्ये राम कैसवार हा 93.20 टक्के गुण मिळवून प्रथम आला.

पालिकेच्या 49 अनुदानित व 161 विनाअनुदानित अशा एकूण 210 माध्यमिक शाळांमधून 13 हजार 563 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 7 हजार 208 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांमध्ये 12 जणांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मुलुंडच्या गुरू गोविंदसिंह पालिका शाळेतील राम महेंद्रप्रसाद कैसवार याने 93.20 टक्के गुण मिळवून मुंबई पालिका शाळांमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. एनएम जोशी मार्ग पालिका शाळेतील पूजा कनोजीया या विद्यार्थिनीने 92.60 टक्के मिळवून दुसरा, तर प्रभादेवी येथील ग्लोब मिल पॅसेज शाळेतील मल्लिका अरुतला हिने 92.40 टक्के मिळकून तिसरा क्रमांक मिळवला आहे. पालिकेच्या तीन शाळांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी ममता राव यांनी दिली.

दोन शाळांचा निकाल 100 टक्के
अभ्युदयनगर मुंबई पब्लिक स्कूल (विनाअनुदानित-इंग्रजी माध्यम) शाळा, गजधर पार्क मनपा माध्यमिक शाळा (विनाअनुदानित – इंग्रजी माध्यम) शाळा आणि ग्लोब मिल पॅसेज मनपा माध्यमिक शाळा (विनाअनुदानित-इंग्रजी माध्यम) शाळेचा निकाल 100 टक्के लागला.