
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरडय़ा पद्धतीने लिंबू सरबत बनवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेनेही संपूर्ण मुंबईत धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये आरोग्याला हानीकारक सरबत, शीतपेय आढळल्यास विक्रेत्याला थेट कोर्टात खेचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये विशेष टीमकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यभरात मार्चअखेरीसच पाऱयाने चाळिशी पार केल्याने घराबाहेर पाडणारे मुंबईकर घामाघूम होत आहेत. अशा वेळी प्रचंड उकाडय़ापासून दिलासा मिळवण्यासाठी नाक्यानाक्यावर सहज उपलब्ध होणारा सरबत जिवाला काहीसा गारवा देत आहे, मात्र कुर्ला स्थानकावरील व्हिडीओमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने धडक कारवाई सुरू केली असून रेल्वे प्रशासनाने तर स्थानकांवरील लिंबू सरबत आणि कालाखट्टावर बंदी घातली आहे. आता पालिकेनेही मुंबईत विकले जाणारे सरबत, शीतपेये विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, उघडय़ावर विकले जाणारी शीतपेये, खाद्यपदार्थ खरेदी करून खाऊ नयेत असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
…तर परवाना रद्द होणार
पालिका अधिकारी-कर्मचारी सरबत विक्रेत्यांकडून नमुने ताब्यात घेत असून सरबत बनवण्याच्या प्रक्रियेवरही ‘नजर’ही ठेवली जात आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जात आहे. शिवाय विकली जाणारी शीतपेये आरोग्यास हानीकारक असल्याचे समोर आल्यास तातडीने सर्व साठा नष्ट करण्यात येत असून संबंधित विक्रेत्यावर न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात येत आहे. यामध्ये जीविताला धोका पोहाचण्यास कारणीभूत ठरल्याचे न्यायालयात स्पष्ट झाल्यास परवानाही रद्द होऊ शकतो अशी माहिती एका पालिका अधिकाऱयाने दिली.
खाद्यपदार्थ विक्रेतेही रडारवर
मुंबईत विकल्या जाणाऱया खाद्यपदार्थांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्षभर पाहणी करून कारवाई सुरू असते, मात्र उन्हाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शीतपेय विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विकणाऱयांवरही विभागाकडून कारवाई सुरू आहे. यामध्येही अस्वच्छता, आरोग्यास हानीकारक पद्धतीने काम होत असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
























































