
सामना ऑनलाईन । मुंबई
व्हीओआयपी कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांना वायग्रा विकण्याचे आमिष दाखवायचे. आगाऊ रक्कम मागून त्यांना गंडवायचे. कुर्ला येथे बोगस कॉल सेंटर थाटून अमेरिकन नागरिकांना वायग्राच्या नावाने चुना लावणाऱ्या आठजणांना गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने बेडय़ा ठोकल्या आहेत.
कुर्ल्याच्या सारा बिझनेस सेंटरमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असून तेथून व्हीओआयपी कॉल तसेच मेसेजद्वारे अमेरिकन नागरिकांना संपर्क साधला जातो आणि त्यांना ऑनलाइन गंडा घातला जात असल्याची खबर युनिट-5 ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, महेश बंडगर व पथकाने त्या कॉल सेंटरवर छापा मारला त्यावेळी तेथे आठ तरुण कॉलिंग करताना सापडले. तसेच तेथे लॅपटॉप, हार्डडिस्क, सर्व्हर, मोबाईल, वाय-फाय डोंगल सापडले. हे सर्व तरुण अकरावी-बारावीपर्यंत इंग्लिश माध्यमात शिकलेले आहेत. त्यामुळे उत्तम इंग्रजी बोलून ते अमेरिकन नागरिकांवर छाप पाडायचे. यू. एस. फार्मसीमधून बोलतोय. व्हीओआयपी कॉलवरून संपर्क साधला जात असल्याने अमेरिकेतूनच बोलत असल्याचे तेथील नागरिकांना वाटायचे. मग हे भामटे यू. एस. फार्मसीमधून बोलत असल्याचे सांगून आम्ही वायग्रा व बंदी असलेली औषधे उपलब्ध करून देतो असे सांगायचे. त्यानुसार समोरून ऑर्डर मिळाली की हे भामटे आगाऊ पैसे मागायचे आणि अमेरिकन नागरिकांची फसवणूक करायचे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गो ऑटो डायलवरून झोल आरोपी गो ऑटो डायल या पोर्टलचा वापर करायचे. मग अमेरिकन नागरिकाचे दिलेले परकीय चलन गेटवेद्वारे हिंदुस्थानी चलनात वळते करून काढून घ्यायचे अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचे सांगण्यात आले.
























































