‘कसाब आणि मी’;पोलीस अधिकारी महालेंच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई क्राइम ब्रँचचे अतिशय हुशार अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेल्या ‘26/11… कसाब आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते रविवार 25 नोव्हेंबर रोजी सायं. 5.15 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आजाद मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे सहपोलीस आयुक्त देवेन भारती हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबईवर 26/11/2008 रोजी पाकिस्तानच्या 10 अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात 9 अतिरेकी लष्कर व मुंबई पोलिसांकडून मारले गेले तर कसाब हा जिवंत सापडला होता. या केसचे प्रमुख तपास अधिकारी म्हणून रमेश महाले यांनी काम पाहिले होते.

महाले यांनी जमविलेल्या सबळ पुराव्यांमुळेच 26/11 चा कट पाकिस्तानने आखला असल्याचे कोर्टात सिद्ध झाले आणि पाकिस्तानचा बुरखा फाडला गेला. हा तपास करताना महाले यांना आलेले अनुभव त्यांनी आता पुस्तकरुपाने वाचकांसमोर आणले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.