
>> डॉ. विजया वाड
यशवंतराव चव्हाणांचे प्रांजळ आणि मनःपूर्वक लेखणीतून उतरलेले आत्मकथन.
ज्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासून आपण प्रेमात पडतो… असे हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र, कृष्णाकाठ! ‘‘आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी सौ. वेणूताई हिच्या स्मृतीस.’’ आपल्या पत्नीवर विलक्षण प्रेम करणारा हा विरळा राजकीय नेता. या पुस्तकाचे पानन् पान वाचनीयतेने नटलेले आहे. अतिशय साधी, ओघवती भाषा! पण हृदयाची भाषा कधी अलंकारीक असते का राजे हो? देवराष्ट्र हे यशवंतरावांचे आजोळ ते कृष्णाकाठापासून चार-दोन मैल दूरच, पण कृष्णेबद्दलचे प्रेम हे जणू त्यांचे बाळकडू म्हणून हा ‘कृष्णाकाठ’.
आपल्या आजोळी देवराष्ट्राला एखादे वर्ष शाळेत गेल्यावर ते पुन्हा कराडला शाळेत जाऊ लागले, पण त्याच्याआधीच 1917 मध्ये वडिलांचे प्लेगने निधन झाले. तेव्हा ते चार वर्षांच होते. त्यांचे बंधू ज्ञानदेव 17-18 चे होते. त्यांस एका इंग्रज अधिकाऱयांच्या माणुसकीने वडिलांच्या जागी कशी नोकरी लागली त्याचे हृदयस्पर्शी वर्णन यशवंतराव करतात.
शाळेतली एक आठवण खूपच सुंदर आहे! शेणोलीकर नावाच्या शिक्षकाने एकदा ‘तुम्ही मोठेपणी कोण होणार’ असा निबंध दिला. प्रत्येकाने हुद्देवार वा थोर पुढारी, नेते यांसारखे होणार असे लिहिले. फक्त एकाच मुलाने लिहिले, ‘मी यशवंत बळवंत चव्हाण’ होणार. शेणोलीकरांना हे विचित्र वाटले. अहंकारी वाटले, पण हेडमास्तर पाठक सरांपर्यंत ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी छोटय़ा यशवंताचे कौतुक केले.
‘वार्ताहर’ होण्याची यशवंतरावांची हौस कशी फिटली ते मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘सिंहासने’ प्रकरण! 26 जानेवारीला झेंडावंदन करणाऱया पोरांना पोलीस कसे अटक करीत होते आणि त्यांची पहिली शास्त्रशुद्ध अटक… दहा बाय बाराची अंधारकोठडी, दिवसभराच्या उपासाने आलेला थकवा नि नंतरची झोप, नंतर उभा राहिलेला खटला नि 18 महिन्यांची सक्तमजुरी अंगावर काटा आणते. ‘‘फौजदारसाहेब दयाळू आहेत. माफी माग. सोडतील.’’ यावर यशवंतरावांना भेटायला आलेली आई म्हणाली, ‘‘काय बोलता तुम्ही मास्तर? माफी? छे! माफी मागायचे कारण नाही. तब्येतीची काळजी घे म्हणजे झाले. देव आपल्या पाठीशी आहे.’’ केवढा हा आईचा स्वाभिमानाचा ठेवा. जो लेकाकडे परावर्तित झाला! खरे ना?
राजाराम कॉलेज-कोल्हापूरच्या आठवणीही वाचनीय झाल्या आहेत. त्यावेळी डॉ. बाळकृष्ण कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांना यशवंतरावांनी त्यांच्या घरी जाऊन आपला पूर्वेतिहास सांगितला. शिक्षणक्रम पुरा करण्याचा निर्धारही सांगितला. गुरू आणि शिष्य यांचा जिव्हाळय़ाचा संबंध पुढील चार वर्षे कायम राहिला. प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके यशवंतरावांना शिकवायला होते. ‘तर्कशास्त्र’ हा विषय त्यांच्यामुळे आवडू लागला असे यशवंतराव म्हणतात. माधवराव पटवर्धन, अर्थात माधव ज्युलियन ‘इंग्रजी कविता’ हा विषय घेत. हीदेखील सुंदर आठवण. जातीय भेदाभेदांकडे तटस्थ वृत्तीने पाहण्याची श्sिाकवण उच्च शिक्षणाने दिली हा अत्यंत महत्त्वाचा विचार यशवंतराव येथे मांडतात. वैयक्तिक आयुष्यात, आईच्या आग्रहास्तव, फलटण येथील रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणूताई हिच्याशी यशवंतरावांचा विवाह झाला. ‘मी वकील असलो तरी राजकीय कार्यकर्ता आहे हे त्यांनी वधूस आधीच स्पष्ट केले. यात पत्नीचे दिव्यासारखे लखलखणारे डोळे बघून मी तीस पसंत केले असे ते लिहून जातात. आपल्या वकिलीच्या व्यवसायाबद्दलही या भागात ते मोकळेपणाने लिहितात. पण यात अशिलांना पकडण्याची जी हिंसक चढाओढ होती ती या निर्मळ मनाच्या माणसास कशी मानवावी हो?
स्वातंत्र्याचा लढा अधिकाधिक तीक्र होत होता आणि अशात यशवंतराव भूमिगत झाले. लग्न केवळ दोन महिने जुने! एक सविस्तर पत्र नवऱयाने पत्नीस टाकले, ज्यात आपल्या भूमिगत होण्याची कारणे होती. ते वाचून त्या नवपरिणित पत्नीस काय वाटले असेल याची कल्पनाच केलेली बरी!
1946 साली बाळासाहेब खेर यांनी मंत्रीपदाऐवजी ‘पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून यशवंतरावांची निवड जाहीर करून टाकली. वेणूबाईंनी होकार भरला. आई म्हणाली, ‘‘मला तुझ्या राजकारणातले काही समजत नाही, पण तुला काही नवे काम करण्याची संधी मिळत आहे तर ती तू सोडू नकोस’’ हा वरल्या कोर्टाचा निर्णय लेकाने मानला आणि आपली नवी दिशा पकडली. आईबद्दलची अतूट श्रद्धा, पत्नीवरले एकनिष्ठ प्रेम, हिंदुस्थानबद्दलची रगारगातली भक्ती, प्रीती नि श्रद्धा, सोसलेल्या यातनांचे उन्नयन अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून अनुकरणयोग्य आहेत. यशवंतराव राजकारणी म्हणूनच नव्हे तर एक तत्त्वनिष्ठ माणूस म्हणून आवडावे. जरूर वाचा ‘कृष्णाकाठ.’ पुढील भाग पुढील वेळी प्रिय वाचकांनो.
कृष्णाकाठ
लेखक – यशवंतराव चव्हाण.
प्रकाशक – प्रेस्टीज प्रकाशन,
पृष्ठ – 320 वी जनआवृत्ती

























































